कसब्यात भाजपची दाणादाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसब्यात भाजपची दाणादाण
कसब्यात भाजपची दाणादाण

कसब्यात भाजपची दाणादाण

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपची दाणादाण उडवून दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना १० हजार ९५० मतांनी धूळ चारली. धंगेकर यांना ७३ हजार १९४, तर रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात मुक्काम ठोकूनदेखील त्यांना धंगेकरांचा अश्‍वमेध रोखता आला नाही. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेनेदेखील धंगेकरांच्या पारड्यात भरभरून मतदान करून विजय सोपा केला.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जाहीर भाजपने टिळक कुटुंबाऐवजी सलग चार वेळा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले रासने यांना उमेदवारी जाहीर केली, तर काँग्रेसकडून धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीचे सर्वच नेते प्रचारात उतरले. त्यांनी मेळावे, सभा, रोड शो घेतले. भाजपच्या धोरणांवर टीका केली, तर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरवले होते. त्यासह अर्धा डझनमंत्री व इतर प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे नेमका विजय कोणाचा होणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती.

पेठा धंगेकरांच्या पाठीशी
आज कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदाम येथे मतमोजणी झाली. पहिल्यांदा टपाली मतदान मोजल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाली. कसबा पेठ, कुंभारवेस, कागदीपुरा या प्रभाग क्रमांक १६ मधील पहिल्या फेरीत धंगेकरांनी आपल्या बालेकिल्ल्यातून ५ हजार ८४४ मते घेतली. रासने यांना भागात २ हजार ८६३ मते मिळाली. पण त्यांना मिळालेल्या मतांपेक्षा धंगेकर यांचे मताधिक्य २ हजार ९८१ इतके जास्त होते. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. सूर्या हॉस्पिटल, अहिल्यादेवी शाळा, आपटे घाट, नेणे घाट, ओंकारेश्‍वर, ज्ञानप्रबोधिनी परिसर या भागातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत रासने यांनी आघाडी घेतली, तरीही धंगेकरांचे मताधिक्य ४५४ इतके कायम होते. सदाशिव पेठ, नारायण पेठेतून धंगेकरांना चांगली मते मिळाल्याने भाजपच्या आनंदावर विरजण पडले.

चौथ्या व पाचव्या फेरीत पुन्हा प्रभाग क्रमांक १६ मधील मतमोजणीत धंगेकर यांनी चांगली आघाडी घेत ३ हजार ३२२ इतके मताधिक्य मिळवले. सहाव्या आणि सातव्या फेरीतील प्रभाग क्रमांक १५ चा टिळक स्मारक मंदिर, चिमण्या गणपती चौक, रेणुका स्वरूप शाळा, अप्पा बळवंत चौक, भिडेवाडा, मोती चौक, बेलबाग, नवनाथ पार यासह इतर भागातील मतदान यंत्रांची मोजणी झाली. येथे दोन्ही फेऱ्यांत रासने यांनी आघाडी घेतली असली तरीही धंगेकरांचे मताधिक्य कापण्याची संधी त्यांना मिळाली नाही. सातव्या फेरीनंतरही धंगेकर हे १ हजार २२७ मतांनी पुढे होते. आठवी आणि नववी फेरी ही प्रभाग क्रमांक १७ मधील रविवार पेठ, रास्ता पेठ भागात झाली. या दोन्ही फेऱ्यांमध्ये धंगेकर यांनी मताधिक्य ४ हजार ४४३ वर नेले. दहाव्या व अकराव्या फेरीत सरस्वती विद्यामंदिर, शुक्रवार पेठ, बदामी हौद, खडक पोलिस ठाणे या भागात रासने यांनी १ हजार १७३ जास्त मते मिळवून आघाडी घेतली. पण त्यानंतरही धंगेकर यांची ३ हजार २७० मतांची आघाडी कायम राहिली.

भाजप पदाधिकाऱ्यांचा काढता पाय
पहिल्या ११ फेऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक १५ चा बहुतांश भाग होता. या भागातूनच भाजपला विजयाची आशा होती. पण त्यांना मताधिक्य मिळवता आले नाही. सुरुवातीपासून धंगेकर हेच आघाडीवर होते. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. नवी पेठ, दत्तवाडी, राजेंद्रनगर, दांडेकर पूल, आंबिल ओढा येथेही भाजपला चांगलाच दणका बसला. शेवटच्या फेऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक १८ आणि १९ मधील खडकमाळ अळी, गुरुवार पेठ,
महात्मा फुले पेठ, गंज पेठ, लोहियानगर, कासेवाडी, महात्मा फुले स्मारक, गणेश पेठ, गाडीखाना, कस्तुरी चौक, बनकर चौक येथे धंगेकर यांना चांगले मतदान झाले. त्यामुळे १२ व्या फेरीपासून शेवटच्या २० व्या फेरीपर्यंत धंगेकर यांनी प्रत्येक फेरीत चांगली मुसंडी मारली. त्यामुळे त्यांचे ११ व्या फेरीतील मताधिक्य वाढत जाऊन अखेर १० हजार ९५० मतांनी विजय मिळवला.

केवळ सहा फेऱ्यांत आघाडी
- रासने यांना २० फेऱ्यांपैकी दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या आणि अकराव्या या सहा फेऱ्यांमध्येच मताधिक्य
- या फेऱ्यांमध्ये अनुक्रमे १३४४, ११८३, ४९९, १४९६, १७९, ९९४ अशी मते
- उर्वरित १४ फेऱ्यांमध्ये धंगेकर यांची आघाडी
- भाजपचा हक्काचा मतदार असलेल्या भागातही धंगेकर यांनी भरभरून मतदान
- चौदापैकी ८ फेऱ्यांमधील मताधिक्य एक हजारापेक्षा जास्त
- २०१ क्रमांक म्हाळसाकांत खंडोबा मंदिर बूथवर धंगेकर आणि रासने यांना २५७ अशी समसमान मते
- २७० बूथपैकी धंगेकर १५७ बूथवर, तर ११३ बूथवर रासनेंची आघाडी
- मतदारांच्या नाराजीमुळे नोटाला मतदान होईल, अशी चर्चा होती; पण केवळ १३९७ जणांनी नोटाला पसंती दिली
- ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांना २९६, तर अभिजित बिचुकले यांना ४७ मते