
चौथ्या औद्योगिक क्रांतीला सुरूवात ः डॉ. शिकारपूर
पुणे, ता. २ ः ‘‘आजच्या पूर्णपणे डिजिटल झालेल्या जगात चौथी औद्योगिक क्रांती घडू लागली आहे. स्वयंचलन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रे होत चालली आहेत. यातून रोबोटिक्स, चित्रकला, संगीत, गायन, संशोधन, हेरगिरी यंत्रणा, लष्कर साहित्य, उद्योग, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र व विस्मयकारी बदल होणार आहेत’’, असे मत संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांच्यातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनावर व साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. शिकारपूर बोलत होते. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष विनय र. र., सुनिल पवार, शशी भाटे, मसापचे कार्यवाह दीपक करंदीकर आदी उपस्थित होते. ‘झपाट्याने वाढत असलेल्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराने विस्मरण होणे, साधी बेरीज-वजाबाकी तोंडी न जमणे, तसेच नैतिकता बदलत चालल्याने पुढील पिढीत होणाऱ्या भयानक समस्यांचाही विचार होणे गरजेचे आहे’, असे मत सराफ यांनी व्यक्त केले.