
राष्ट्रवादीचे दयानंद इरकल यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
पुणे, ता. २ : बेकायदेशीर आंदोलन करून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस हवालदार नवनाथ नामदेव डांगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून दयानंद इरकल (रा. गोखले नगर), पंकज पवार, शंकर डोंगरे, सुनील मुंढे, गोट्या बदामी यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात एका वकील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी इरकल आणि त्यांच्या पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच्या निषेधार्थ इरकल यांनी २८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमुळे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. परंतु, इरकल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर आंदोलन करून घोषणाबाजी केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.