मोठेपणा मिरविणाऱ्यांना चोख उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठेपणा मिरविणाऱ्यांना चोख उत्तर
मोठेपणा मिरविणाऱ्यांना चोख उत्तर

मोठेपणा मिरविणाऱ्यांना चोख उत्तर

sakal_logo
By

- ब्रीजमोहन पाटील
‘कसब्यात कमळच’ अशी घोषणा देत भाजपने पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह भलीमोठी यंत्रणा कामाला लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासकामे आणि हिंदुत्वामुळे आमचा विजय निश्चित आहे, असे भाजपची नेते मंडळी सांगत होते. मात्र तळागाळात काम करणारा रवींद्र धंगेकर हा एक कार्यकर्ता काँग्रेसकडून निवडणुकीत उभा राहिला आणि भाजपचा पराभव करत त्याने भ्रमाचा फुगा फोडला. महापालिकेत पाच वर्षे सत्ता भोगताना पक्षाने कसब्यातच महत्त्वाची पदे दिली. पण त्याचा फायदा पोटनिवडणुकीत झाला नाही. केवळ मोठेपणा मिरविणाऱ्या शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना मतदारांनी ‘हू इज धंगेकर?’ या प्रश्‍नाचे उत्तर मतपेटीतून दिले. सुधारणा करा नाही, तर आगामी महापालिका, विधानसभेलाही हेच परिणाम दिसतील, असा संदेश मतदारांनी दिला आहे.

सत्ताकेंद्र असूनही समस्यांकडे दुर्लक्ष
कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गिरीश बापट पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले, मुक्ता टिळक यादेखील चांगल्या मताधिक्याने आमदार झाल्या. मतदारसंघात १६ नगरसेवक होते, महापौर, सभागृहनेते यासह चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपद कसब्यातच होते. त्यामुळे सहज विजय होईल, असा भ्रम भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना होता. मात्र कसब्यात गेल्या अडीच-तीन वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा अपुरा पुरवठा या समस्या सुटल्या नाहीत, याचाही मतदारांनी विचार केल्याचे दिसते.

पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा फटका
प्रचाराची सुरवात झाल्यापासून मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून यंत्रणा लावली. तीन विद्यमान आमदार आणि तीन माजी आमदारांना प्रत्येकी एका प्रभागाची जबाबदारी देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले. मात्र अनेक ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय न झाल्याने उमेदवाराचे पत्रक मतदारांपर्यंत पोहचले नसल्याचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे गेला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत कान टोचले होते. भाजपची तगडी यंत्रणा केवळ कागदावरच राहिली, प्रत्यक्षात काम होत नव्हते. शहरातील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क नसणे, ठराविक कार्यकर्ते सोडून इतरांशी संवाद नसल्याने कामातील मर्यादा दिसून आल्या. त्यामुळे प्रचार यंत्रणेत शहरातील काही जुन्या-जाण्यात पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन यंत्रणा कामाला लावावी लागली. राज्यातील कार्यकर्ते पुण्यात बोलावून त्यांच्याकडे जबाबदारी देण्याची नामुष्की ओढावील.

शिंदे-फडणवीसांनी घातले लक्ष
अखेरच्या टप्प्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचाराला उतरावे लागले. शिंदे तीन दिवस पुण्यात मुक्काम ठोकून होते, तर देवेंद्र फडणवीस हे पाच दिवस पुण्यात आले. दोघांनीही रोड शो करून मतदारांची मते वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेल्या बैठकांनंतर यंत्रणा अधिक जोमाने कामाला लागली. विरोधकांच्या अल्पसंख्याक मेळाव्यातील वक्तव्याचा फायदा घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला. पण या दोन नेत्यांनी केलेले प्रयत्न, हिंदुत्वाचा मुद्दा भाजपला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकला नाही. त्यामुळे आता फडणवीस यांना शहरातील संघटनेत लक्ष घालूनच काहींची हकालपट्टी व नव्या कार्यक्षम चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे.

बापट यांच्याकडून काय मिळवलं?
या निवडणुकीत खासदार गिरीश बापट आजारपणामुळे पूर्णवेळ सहभागी होऊ शकले नाहीत. भाऊंचा सर्व जाती-धर्मात, वस्त्यांमध्ये जनसंपर्क आहे, त्यांनी लोक जपली आहेत, विरोधकही निवडणुकीत मदत करतात, त्यामुळे गेल्या २८ वर्षांपासून कसबा भाजपच्या ताब्यात होता, असे भाजपचे नेतेच सांगतात. पण बापट यांच्याशिवाय निवडणूक लढविण्याची वेळ आल्यानंतर भाजपची यंत्रणा उघडी पडली. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी, नेते, नगरसेवक बापट यांच्याकडून इतक्या वर्षात काय शिकले? असाच प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.