‘महाविकास आघाडीच्या भविष्याची नांदी’

‘महाविकास आघाडीच्या भविष्याची नांदी’

पुणे, ता. २ : महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकदिलाने काम केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनीच तळमळीने काम केल्यामुळेच विजय मिळाला. कसबा मतदारसंघात मिळालेला हाच विजय महाविकास आघाडीच्या भविष्यातील विजयाची नांदी ठरेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविल्यानंतर राष्ट्रवादी भवनामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना धंगेकर म्हणाले, ‘‘कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पैशांचे राजकारण आवडले नाही. पैसेवाटपाचा हा प्रकार भाजपसारख्या पक्षाला शोभणारा नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील सगळ्यांनीच चांगले काम केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटले. प्रशांत जगताप, मोहन जोशी, संजय भोसले यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. माझ्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचे काम शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेने केले. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि सरकार पाडण्याचा राग मतदारांच्या मनात होता, तो आज मतदानातून व्यक्त झाला.’’

भाजपने निवडणुकीत पैशांचा, गुन्हेगारांचा वापर केला. त्यास धंगेकरांच्या विजयाने सडेतोड उत्तर दिले. मागील २० दिवस या निवडणुकीने राज्यच नव्हे, तर देशाचे लक्ष्य वेधले होते. विशेषतः या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांची ताकद दाखविली.
- प्रशांत जगताप, पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मी ही बारामतीचाच! बापटांनाही भेटणार...
मी मूळचा बारामतीमधीलच आहे, माझा जन्म बारामतीमध्ये झाला आहे. पवार कुटुंबीयांनी मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य, त्यांचा मुलगा म्हणूनच कायम वागणूक दिली आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी माझ्यासाठी तीनदा प्रचारात सहभाग घेत व्यापारी, खेळाडू, अल्पसंख्याकांचे मेळावे घेत मोठी ताकद दिली. अजित पवार यांनीही माझ्या विजयासाठी बारकाईने लक्ष दिले. माध्यमांना बाईट देताना सावकाश दे, अतीघाई करू नकोस, असा प्रेमळ सल्लाही दिला. गिरीश बापट हे पुण्याचे मोठे नेते आहेत. त्यांना नक्कीच भेटणार आहे. याबरोबरच टिळकवाडा, शिवसेना कार्यालयात जाणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com