
जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार
पुणे, ता. २ : जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बिबवेवाडी येथील शिवरायनगरमध्ये बुधवारी (ता. १) सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी सचिन दयानंद खांडेकर (वय २३, रा. अप्पर बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली. सचिन हा पायी जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्याला अडवून कोयत्याने वार केले. तसेच, कपाळावर आणि पाठीवर दगडाने मारून जखमी केले. त्यावरून सचिन कसबे आणि अनिकेत कसबे या संशयितांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरले
पुणे, ता. २ : एका महिलेने ज्येष्ठ महिलेची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र आणि दीड हजारांची रोकड असा सुमारे ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना कात्रज चौकातील अंबिका हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने (वय ७०, रा. मांगडेवाडी, कात्रज) फिर्याद दिली. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने तक्रार दिल्यानंतर बुधवारी गुन्हा दाखल केला.
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
पुणे, ता. २ : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. त्यावरून एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत घडला. तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
पुणे, ता. २ : लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. मांजरी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली. त्यावरून हडपसर पोलिसांनी अक्षय हरिश्चंद्र जाधव (रा. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि या तरुणीची डिसेंबर २०२१ मध्ये शादी डॉट कॉम संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपीने तरुणीला सैन्यात जवान असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या तरुणीने लग्नाबाबत विचारले असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.