
दौंडच्या डेमूला वारंवार उशीर
पुणे, ता. २ ः गेल्या काही दिवसांत दौंडहून सुटणाऱ्या डेमूला (लोकल) वारंवार उशीर होत आहे. यातच आता सोलापूर-पुणे डेमू ही पुणे स्थानकापर्यंत न धावता हडपसर स्थानकापर्यंत धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय रद्द करावा; तसेच शिवाजीनगर स्थानकावरून लोकल न सोडता हडपसर स्थानकावरून सुरु करावी आदी मागण्यांचे निवेदन पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपने विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांना दिले.
रेल्वे प्रशासनाने ६ मार्चपासून पुणे-सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेमूच्या स्थानकात बदल केला आहे. ही रेल्वे हडपसर स्थानकावरून सुटेल व तिथेच प्रवास संपणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करून पुण्यावरूनच रेल्वे सोडावी. तसेच पुणे स्थानकावरील ताण कमी करायचा असेल तर लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल शिवाजीनगर येथून न सोडता त्या हडपसर स्थानकावरून सोडाव्यात. दौंडच्या डेमूमध्ये तिकीट पर्यवेक्षकच नसतो. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी पुणे ग्रामीण प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष फारुख बागवान, कार्याध्यक्ष प्रमोद उबाळे, अक्षय खेडेकर, सागर शेळके, संतोष कांचन आदी उपस्थित होते.