राजमाता भुयारी मार्ग विस्तारासाठी केंद्राचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजमाता भुयारी मार्ग विस्तारासाठी केंद्राचा निधी
राजमाता भुयारी मार्ग विस्तारासाठी केंद्राचा निधी

राजमाता भुयारी मार्ग विस्तारासाठी केंद्राचा निधी

sakal_logo
By

पुणे, ता. २ : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील राजमाता भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार हे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली.

नवले पूल आणि परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘महापालिकेचा विकास आराखड्यात कात्रज येथील सध्याचा भुयारी मार्ग तोडून नवीन भुयारी मार्ग करण्याच्या कामाला केंद्राने गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सातारा (शेंद्रे) ते पुणे (देहूरोड) केंद्राच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारित असून कात्रज नवीन बोगदा-जांभुळवाडी-दरीपूल-नऱ्हे-नवले पूल-वडगाव-वारजे या दहा किमी लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. दरीपूल ते नवले पूल दरम्यान महामार्गाचा उतार ३.४८ टक्के असून तो इंडियन रोड काँग्रेसने प्रमाणित केलेल्या मानकानुसार आहे. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान झालेले अपघात बहुतांशी ट्रक, अवजड वाहने न्यूट्रल गिअरमध्ये चालविण्यामुळे, निष्काळजीपणामुळे आणि वाहनांच्या तांत्रिक बिघाडामुळे झाले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

नऱ्हेत स्पीड कॅमेरा
नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर येथे ६० किमी प्रतितास वेग मर्यादेचे सुचनाफलक तसेच रम्बल स्ट्रिप्स, मार्गिका आखणी, कॅट आइज, पथदिवे, अपघात प्रवण क्षेत्र दर्शविणारे सुचनाफलक, ब्लिंकर्स बसविण्यात आले असून नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ स्पीड कॅमेरा बसविला आहे. दरीपूल ते सिंहगड रस्त्यापर्यंत डाव्या बाजूचा सेवा रस्ता बांधला आहे. उजव्या बाजूस सिंहगड रस्ता ते इंद्रायणी शाळेपर्यंत सेवा रस्ता असून नऱ्हे स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या बाजूने समांतर नाला असल्याने महामार्गाच्या हद्दीत सेवा रस्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेकडून सेवा रस्ता पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.