पोटनिवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोटनिवडणूक
पोटनिवडणूक

पोटनिवडणूक

sakal_logo
By

कसब्यात ‘धडा’; चिंचवडमध्ये ‘सूचक इशारा’
पोटनिवडणूक ः आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट करणारे निकाल

पुणे, ता. २ ः सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने भाजप व मित्रपक्षांबरोबरच महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. सत्तेच्या बळाचा वापर केल्यास व मतदारांना गृहित धरल्यास काय होऊ शकते, हे कसब्यातील मतदारांनी भाजपला दाखवून दिले आहे तर भाजपविरुद्ध लढण्यासाठी आघाडी केली नाही तर भविष्यातील निवडणुकांमध्ये काय होऊ शकते याचा इशारा महाविकास आघाडीला चिंचवडच्या निकालाने दिला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार हेमंत रासने यांना १० हजार ९५० मतांनी धूळ चारली. धंगेकर यांना ७३ हजार १९४, तर रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीत भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवार अश्‍विनी जगताप यांचा सुमारे ३६ हजार १६८ मताधिक्याने विजय झाला. जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली तर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली.
टपाली मतदानाने कसब्याची मतमोजणी सुरू झाल्यापासून धंगेकर यांनी जी आघाडी घ्यायला सुरुवात केली ती मोडणे रासने यांना शेवटच्या म्हणजे विसाव्या फेरीपर्यंत शक्य झाली नाही. कसब्यासारख्या बालेकिल्ल्यात भाजपची एवढी दयनीय अवस्था नेत्यांना आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. ‘‘ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे,’’ हे सुरुवातीपासून सांगणारे धंगेकर यांनी स्वतःचे विधान खरे करून दाखविले. महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी दिसल्या, तरी तिन्ही पक्ष एकत्र राहिल्याने काँगेसचा विजय सुकर झाला. दुसऱ्या बाजूला चिंचवडमध्ये आश्‍विनी जगताप यांचा विजय झालेला असला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार काटे व अपक्ष कलाटे यांना मिळालेली मते पाहता येथेही दुहेरी निवडणूक झाली असती तर निकाल काय लागला असता, याचा विचार करून भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाविष्यातील पाऊले टाकावी लागणार आहेत.

कसब्यात काय झाले?
- रासने यांना २० फेऱ्यांपैकी दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या आणि अकराव्या या सहा फेऱ्यांमध्येच मताधिक्य
- या फेऱ्यांमध्ये अनुक्रमे १३४४, ११८३, ४९९, १४९६, १७९, ९९४ अशी मते
- उर्वरित १४ फेऱ्यांमध्ये धंगेकर यांची आघाडी
- भाजपचा हक्काचा मतदार असलेल्या भागातही धंगेकर यांनी भरभरून मतदान
- चौदापैकी ८ फेऱ्यांमधील मताधिक्य एक हजारापेक्षा जास्त
- २०१ क्रमांक म्हाळसाकांत खंडोबा मंदिर बूथवर धंगेकर आणि रासने यांना २५७ अशी समसमान मते
- २७० बूथपैकी धंगेकर १५७ बूथवर, तर ११३ बूथवर रासनेंची आघाडी
- मतदारांच्या नाराजीमुळे नोटाला मतदान होईल, अशी चर्चा होती; पण केवळ १३९७ जणांनी नोटाला पसंती दिली
- ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांना २९६, तर अभिजित बिचुकले यांना ४७ मते

चिंचवडमध्ये काय झाले?
- तिरंगी लढतीमुळे कमालीची चुरस
- बहुतांश फेऱ्यांत जगताप यांचीच आघाडी कायम
- एका ईव्हीएम मशिनमध्ये चुकीची तारीख आल्याने काही काळ गोंधळ
- मामुर्डी, किवळे, रावेत, विकासनगर भागात जगताप यांना अनपेक्षित मताधिक्य
- खासदार बारणे यांच्या थेरगाव भागात जगताप यांनाच मताधिक्य
- रहाटणी-पिंपळे सौदागरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना मताधिक्य
- अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह २६ जणांचे डिपॉझिट जप्त

धंगेकरांचे बेरजेचे गणित
- रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जनमत आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी झाले.
- मतमोजणीपर्यंत हे जनमत कमी करणे भाजपला शक्य झाले नाही.
- अखेर शेवटच्या टप्प्यात हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणून देखील जनतेचे मतपरिर्वन करणे शक्य नाही.
- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि हिंदुत्व फक्त यांच्याच मुद्यांवर निवडणुका जिंकता येऊ शकते, हा भाजपच्या नेत्यांचा भ्रम या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी फोडला.
- जनतेला गृहीत धरून नाही, तर कामेही करावी लागतात, याचा धडा मतदारांनी दिला.
- या उलट गेली पंधरा वर्ष या मतदार संघात धंगेकर यांनी जाणीवपूर्वक मतदारांशी संपर्क ठेवला.
- म्हणूनच मतदारांनी भरभरून त्यांच्या झोळीत मते टाकली.

भाजपचे चुकलेले गणित
- पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपची गणिते चुकीची ठरल्याचे निकालाने स्पष्ट झाले.
- ब्राम्हण समाजाला उमेदवारी का नाही, यांचे उत्तर अखेरपर्यंत नेत्यांना देता आले नाही.
- निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य, खासदार गिरीश बापट यांची तब्येत ठीक नसताना त्यांना प्रचारात उतरविण्याचा केला गेलेला प्रयत्न, गणेश मंडळ, व्यापारी संघटना यांना झालेला ‘आग्रह’, सरकारी यंत्रणांचा नको तेवढा वापर या व अशा गोष्टी लोकांपासून लपून राहिल्या नाहीत.
- निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेला निकाल मतदारांना रूचला नाही.
- शेवटच्या दोन दिवसांत घातलेल्या गोंधळाने त्यात आणखी भर पडली.
- याचा परिपाक म्हणून त्याचा फटका भाजपला बसला.
- प्रचंड यंत्रणा कामाला लावून ही जनतेचे मतपरिवर्तन करण्यात भाजप कमी पडली.


...तरी भाजपला अपयश
१९९१ मध्ये कसब्यात पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचा विजय मिळाला होता. त्यानंतर १९९५ पासून २०१९ पर्यंतच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत कायमच तिरंगी लढत राहिली. त्याचा आपसूक फायदा भाजपला होत राहिला. मात्र त्यालाही पोटनिवडणूक अपवाद ठरली. भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सरळ लढत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्यासह डझनभर आमदार या मतदार संघात ठाण मांडून बसले होते. शहरातील सर्व ताकद या मतदार संघात भाजपने उतरली. शेवटच्या दोन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ही पाय धरले. तरी देखील भाजपला यश खेचून आणता आले नाही.

चमक दाखविता आली नाही
महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही निवडणूक त्यासाठीच प्रतिष्ठेची केली होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या हातात न ठेवता भाजपच्या प्रदेश पातळीवर नेत्यांनी ही निवडणूक हाती घेतली. परिणामी एकवेळ धंगेकर विरुद्ध भाजप अशी लढत असल्याचे चित्र झाले होते. प्रयत्न करूनही भाजपला ही निवडणूक पक्ष पातळीवर
नेण्यात पुरेसे यश आले नाही. तर पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनाही या निवडणुकीत चमक दाखविता आली नाही.

महाविकास आघाडीने दाखवून दिले
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, युवानेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी मतभेदाचे जोडे बाहेर ठेऊन एकदिलाने काम करीत एकीचे बळ दाखवून दिले. आम्ही एकत्र आलो, तर पराभव करणे शक्य नाही, हेच या निमित्ताने महाविकास आघाडीने दाखवून दिले.