चिंचवड पोटनिवडणुकीतून वाजले लोकसभेचे बिगुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By-Election
चिंचवड पोटनिवडणुकीतून वाजले लोकसभेचे बिगुल

चिंचवड पोटनिवडणुकीतून वाजले लोकसभेचे बिगुल

चिंचवड पोटनिवडणूक निकालात अश्विनी जगताप म्हणजेच भाजपच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. या मतदारसंघावर दोन दशकांहून अधिक काळ निर्विवाद वर्चस्व राखलेले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. राज्यात सध्या भाजपचे सरकार असले, तरी शिवसेनेच्या फुटीनंतर तयार झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये ही निवडणूक पार पडत असल्याने तिला विशेष महत्त्व आले.
- शीतल पवार

युती विरुद्ध आघाडी
युती आणि आघाडीच्या गणितांमध्ये चिंचवडला स्थानिक नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा नेहमीच निवडणुकांच्या गणितांवर परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीत जेव्हा चिंचवडची जागा काँग्रेसला मिळाली, तेव्हा लक्ष्मण जगताप अपक्ष उमेदवार होते, तर शिवसेनेकडून सध्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संधी मिळाली होती.

त्या निवडणुकीत अजित पवार यांच्या मदतीने जगताप यांची सरशी झाली. पुढे जगताप यांचा प्रभाव मतदारसंघावर कायम राहिला. जगताप यांना विरोध म्हणून राहुल कलाटे यांनी राजकारण करून बघितले. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. अशाप्रकारे इथे राजकारणाची समीकरणे पक्षांऐवजी व्यक्तींच्या प्रभावाभोवती फिरत राहिली.

शिवसेनेचा जनाधार
२०२२ मध्ये राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर मावळचे खासदार बारणे (मुळची शिवसेना) यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर राहणे पसंत केले. म्हणजेच त्यांनी चिंचवडमध्ये भाजपसोबत जुळवून घेतले.

नंतर या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्यासाठी प्रत्यक्ष प्रचारसभा घेतल्या, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ‘रोड शो’देखील केला. परिणामी, त्यांच्या प्रभावातली शिवसेनेची काही मते जगताप यांच्या बाजूने वळविण्यात महायुतीला यश आले.

पण त्याचवेळी शिवसेनेचे महापालिकेत गटनेते राहिलेले राहुल कलाटे अपक्ष निवडणूक लढले, तेव्हा त्यांना मिळालेला जनाधार बघता सेनेची सर्वच्या सर्व मते भाजपच्या पारड्यात आली असे चित्र दिसत नाही. उलटपक्षी या भागात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून शिवसेनेला मतदान करणारा मतदार आहे, की व्यक्तिगत करिष्म्यावरच शिवसेनेची ताकद अवलंबून होती, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.

राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी
अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली. त्यांचे मताधिक्य ३६ हजार १६८ राहिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. काटे यांना मिळालेली मते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी-चिंचवडमध्ये नवसंजीवनी देणारी ठरली आहेत.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत अनेकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत राहणे पसंत केले. त्यामुळे राष्ट्रवादीची दुसरी फळी पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय झाली. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन नियोजन आणि प्रचारात झोकून दिल्याचे चित्र दिसले. यात महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता.

प्रचारादरम्यान काही नगरसेवकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यातूनही पक्षाभोवती सकारात्मक नरेटिव्ह बांधणी करण्यात यश मिळाल्याचे दिसते. त्यात अजित पवार यांचा निश्चितच महत्त्वाचा वाटा राहिला. पक्षाभोवतीची ही जनभावना कायम ठेवून निष्ठावंत आणि नवीन चेहऱ्यांचा समतोल राष्ट्रवादीला येत्या काळात महापालिका ते विधानसभा असा साधावा लागेल.

शिवसेना आणि लोकसभा
या निवडणुकीतून तयार झालेल्या वातावरणाचा प्रभाव आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर नक्कीच राहील. पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मावळ लोकसभेमधील दोन तर शिरूर लोकसभेतील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे (तात्कालीन आणि आताच्या) श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे उमेदवार होते.

या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत अजित पवार आणि मविआ नेत्यांच्या प्रचाराचा भर शिवसेना कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्यावर राहिला. शिवसेनेतल्या ठाकरे ते शिंदे या सत्ताबदलाबद्दलची जनसामान्यांनी व्यक्त केलेली नाराजी, शिवसेनेच्या जनाधाराबद्दल निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली नवसंजीवनी यामुळे येत्या काळात या दोन्हीही जागांवर सध्याचे शिवसेनेचे नेतृत्व अडचणीत येऊ शकते.

मावळ लोकसभेतील विधानसभानिहाय आकडेवारी : चिंचवड विधानसभा
शिवसेना ६३.००% १७६४७५
राष्ट्रवादी २८.४६% ७९७१७
वंचित ६.१४% १७२०९
इतर २.४०% ६७२०

मावळ लोकसभेतील विधानसभानिहाय आकडेवारी : मावळ विधानसभा
शिवसेना ५०.३८% १०५२७२
राष्ट्रवादी ३९.९३% ८३४४५
वंचित ५.६१% ११७३१
इतर ४.०७% ८५०६

मावळ लोकसभेतील विधानसभानिहाय आकडेवारी : पिंपरी विधानसभा
शिवसेना ५४.९८% १०३२३५
राष्ट्रवादी ३२.९९% ६१९४१
वंचित ९.४८% १७७९४
इतर २.५६% ४८०९

शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा क्षेत्रात लोकसभेतील आकडेवारी
शिवसेना ५३.००% १२५३३६
राष्ट्रवादी ३७.३२% ८८२५९
वंचित ७.२०% १७०३४
इतर २.४७% ५८४४