
यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनला ‘पियूची वही’ भेट
पुणे, ता. ३ ः महापालिकेच्या येरवडा येथील लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन मराठी शाळेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ‘पियूची वही’ हे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकांच्या ३५ प्रती शाळेला भेट दिल्या. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सीमा चव्हाण यांनी ही पुस्तके भेट दिली. यावेळी कार्यवाह डॉ. दिलीप गरुड, शाळेचे माजी मुख्याध्यापक विलास रासकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कुसुमाग्रजांचे मराठी भाषेसाठी असलेले योगदानाबद्दल विद्यार्थिनी श्रेया रणदिवे, गणेश हरगुडे, अनुसया पांडे आदींनी भाषणे केली. सहावीच्या विद्यार्थ्यांनी संत जनाबाई रचित जात्यावरील ओव्या, मनाचे श्लोक तर पाचवीच्या विद्यार्थ्यांने पोवाडा, चौथीतील विद्यार्थ्यांनी छान छान बडबड गीते, सहावीच्या विद्यार्थ्यांनी श्लोक आदींचे सादरीकरण केले.