परीक्षा वेळापत्रकावरचा विश्वास उडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा वेळापत्रकावरचा विश्वास उडाला
परीक्षा वेळापत्रकावरचा विश्वास उडाला

परीक्षा वेळापत्रकावरचा विश्वास उडाला

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लेखी परीक्षा घेणार म्हणून अचानक ऑनलाइन आणि बहुपर्यायी परीक्षा घेतली. दिवाळी आधी जाहीर झालेले अधिकृत वेळापत्रक पुन्हा एकदा दिवाळीनंतर पुढे ढकलले, एकदा पुढे ढकलेले वेळापत्रक परीक्षेच्या तोंडावर अचानक बदलले. अशा सततच्या बदलांमुळे विद्यापीठाचा सही शिक्का असलेले अधिकृत वेळापत्रकावरचाही विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जोशी या विधी विभागाच्या विद्यार्थ्याने दिली आहे.
कोरोनानंतर दीड वर्षे उलटले तरी विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक आजवर पूर्वस्थितीत आलेले नाही. त्यात परीक्षेच्या तारखांहून सातत्याने आंदोलन होते आहे. परीक्षा विभाग आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होत परीक्षा पुढे ढकलली जाते. मात्र यात सर्वसामान्य विद्यार्थ्याचे नियोजन कोलमडत आहे. विद्यापीठाने वेळापत्रक निश्चित करण्यापूर्वी सर्व शक्यतांचा एकदा विचार करायला हवा, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही त्याचे नियोजन करता येते. विद्यार्थी संघटना, विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा विभागाने या बद्दल ठोस निर्णय घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आंदोलनाचा दुसरा दिवस
विधी विद्या शाखेतील परीक्षांच्या वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. ३) आंदोलनाचा तिसरा दिवस असून, एका विद्यार्थ्याची तब्येतही खालावली आहे. आंदोलक विद्यार्थी अक्षय चव्हाण सांगतात, ‘‘विद्यापीठाने ९० दिवसांच्या सत्र पूर्ततेनंतरच परीक्षा घ्यावी, रविवार आणि शनिवारचा दिवस वगळून एक दिवसाआड परीक्षा घ्यावी, अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात आणि आमरण उपोषण करत आहोत.’’

काय झाला परिणाम?
- विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोलमडते
- प्राध्यापक घाईने शिकवून मोकळे होतात
- बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे प्रवासाचे नियोजन कोलमडते
- शैक्षणिक वेळापत्रक कोलमडते


विद्यापीठाने ९० दिवसांची सत्र पूर्ततेनंतर परीक्षा घ्यावी. तसेच संभाव्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षा आणि एका दिवसाचा गॅप गृहीत धरूनच घेऊनच सर्वसमावेशक वेळापत्रक तयार करावे. सातत्याने वेळापत्रकात बदल केल्याने आम्ही मेटाकुटीला आलो आहे. शैक्षणिक वेळापत्रकात तातडीने सुसूत्रता आणावी.
- भक्ती भावे, विधी विद्या शाखेची विद्यार्थिनी

विधी विद्या शाखेची परीक्षा ९० दिवसांच्या सत्रपूर्ततेनंतरच घोषित केली आहे. उलट अधिकचे ४० दिवस वाढवून दिले आहे. परीक्षा तातडीने संपवावी असे सरकारचे निर्देश असून, पुढील शैक्षणिक वेळापत्रकाच्या दृष्टीने आवश्यक बदल केले आहे. सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून, आता यात कोणताही बदल होणार नाही.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ