
सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे, ता. ३ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पेपर एकमध्ये पाच लाख ७९ हजार ८४४ उमेदवार, तर पेपर दोनमध्ये तीन लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत.
सीबीएसईतर्फे २८ डिसेंबर ते ७ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना परीक्षेचा निकाल ‘ https://ctet.nic.in’ किंवा ‘https://cbse.nic.in’ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. उमेदवारांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लवकरच डिजी लॉकरमध्ये अपलोड करण्यात येईल. उमेदवारांना त्यांनी परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून ‘डिजी लॉकर’मधून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे.
सीटीईटी परीक्षेतील ‘पेपर एक’साठी देशभरातून १७ लाख ४ हजार २८२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २२ हजार ९५९ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून त्यापैकी पाच लाख ७९ हजार ८४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर परीक्षेतील ‘पेपर दोन’साठी १५ लाख ३९ हजार ४६४ उमेदवारांनी नोंदणी केली. तर १२ लाख ७६ हजार ७१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील तीन लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना सीटीईटी किंवा ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती सीटीईटी संचालकांच्या वतीने देण्यात आली आहे.