धंगेकर यांनी घेतली
गिरीश बापट यांची भेट

धंगेकर यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

पुणे, ता. ३ ः कोणी शिपाई, कोणी सुरक्षारक्षक, क्‍लर्कपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच शुक्रवारी सायंकाळी रवींद्र धंगेकर यांच्यासमवेत सेल्फी, छायाचित्रे घेण्यासाठी अक्षरशः चढाओढ सुरु होती. २०-२५ वर्ष नगरसेवक राहिलेले धंगेकर यांना ‘आमदार साहेब’ म्हणून आवाज देत, त्यांच्याशी तितक्‍याच आपुलकीने संवाद साधत, जुन्या आठवणींना उजाळा देत महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तितक्‍याच हक्काने एक-एक फोटो काढून त्यांच्यासमवेतच्या आठवणींना कॅमेऱ्यात कैद केले. याबरोबरच धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांची आवर्जून भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आपल्या कामाचा श्रीगणेशा केला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांची पुण्यासह महाराष्ट्रभर जोरदार चर्चा झाली. मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी काहीसा निवांत वेळ मिळाल्यावर धंगेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या आवारात हजेरी लावली. धंगेकर यांना पाहून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही तितकाच आनंद झळकला. महापालिकेचे सुरक्षारक्षक, शिपाई, जमादार, क्‍लर्कपासून ते विविध विभागांचे विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही धंगेकर यांची आवर्जून भेट घेत, हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. धंगेकर यांनीही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत, त्यांच्या खांद्यावर हात टाकून आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यासमवेत छायाचित्र काढतानाच जुन्या आठवणींना उजाळा देत ते काही क्षण हास्यविनोदातही रंगले. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीमध्ये पुष्पगुच्छ मागवित त्यांचा सन्मानही केला.
दरम्यान, धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बापट यांनीही धंगेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्याशी काही प्रमाणात संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com