
दुचाकी चोरट्यास अटक, आठ गुन्हे उघडकीस
पुणे, ता. ३ : सिंहगड रस्ता पोलिसांनी धायरी फाट्याजवळ एका दुचाकी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी या परिसरातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणत त्याच्या ताब्यातून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.
रोहन महेंद्र देवरकर (वय १९, रा. पोकळेनगर, सरडेबाग, उत्तमनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या वाहनचोरीच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी-कर्मचारी गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी आबा उत्तेकर, शिवाजी क्षीरसागर आणि राहुल ओलेकर यांना वडगाव पुलाखाली धायरी फाट्याजवळ एकजण केसरी रंगाच्या यामाहा दुचाकीवर थांबल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक सचिन निकम यांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे आणि परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु चौकशीदरम्यान त्याने ही दुचाकी हॅप्पी कॉलनी, वडगाव येथून चोरी केली. तसेच, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, लोणी काळभोर आणि वडगाव परिसरातून आठ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकम करीत आहेत.