
‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानाद्वारे जलसंवर्धन
पुणे, ता. ४ ः हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आणि खडकवासला ग्रामस्थांच्यावतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान धूलिवंदन मंगळवार (ता. ७) आणि रंगपंचमी रविवार (ता. १२) या दिवशी प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे पराग गोखले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप मेहता उपस्थित होते. पराग गोखले म्हणाले, ‘‘गेल्या २० वर्षांपासून हे अभियान राबविले जात आहे. या उपक्रमांतर्गत खडकवासला धरण येथे मानवीसाखळी करून जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षणाचा संदेश दिला जातो. तसेच धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या रंगांमुळे होणारे प्रदूषण, सण-उत्सवांमागचा उद्देश, ते साजरे करण्याची पद्धत यांच्या विषयी प्रबोधन केले जाते.’’
‘‘संस्कृतीतील प्रत्येक सण, उत्सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक उन्नतीला पोषक आहेत. मात्र, उत्सवांमागील धर्मशास्त्र सर्वसामान्यांना अवगत नसल्याने उत्सवांमध्ये अपप्रकार होत आहेत. रंगपंचमी सण साजरा करताना रासायनिक रंगांचा वापर करत अनेक जण जलाशयात अंघोळीसाठी उतरतात. परिणामी पाणीपुरवठ्याचे हे जलस्त्रोत प्रदूषित होते. जलसंवर्धनासाठी अशा अभियानामध्ये स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग, पोलिस आदींचा ही सहभाग असतो,’’ असे पेटकर यांनी सांगितले.