खर्चाचे गणित जुळवण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्चाचे गणित जुळवण्याचे आव्हान
खर्चाचे गणित जुळवण्याचे आव्हान

खर्चाचे गणित जुळवण्याचे आव्हान

sakal_logo
By

महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ५ ः स्पर्धेसाठी उभ्या केलेल्या नाटकाचे सातत्यपूर्ण प्रयोग करायचे असतील, तर खर्चाचे गणित जुळवण्याचे आव्हान कलाकारांसमोर आहे. त्यासाठी प्रत्येक प्रयोगाला प्रायोजक शोधणे, प्रेक्षकांना नाट्यगृहात आणण्यासाठी नाटकाची योग्य जाहिरात करणे, या आघाड्यांवर काम करावेच लागेल. त्यासह, छोट्या नाट्यगृहांमध्ये प्रयोग करण्यासाठी नाटकात आवश्यक ते बदल करण्यासारख्या काही तडजोडीही स्वीकाराव्या लागतील, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या नाटकांचे प्रयोग आयोजित केले जात असत. त्यामुळे स्पर्धेनंतरचा किमान एक प्रयोग करणे तरी या नाट्यसंस्थांना सहजशक्य होते. मात्र नाट्य परिषदेच्या मालकीचे नाट्यगृह गेल्यानंतर हे प्रयोग होणे बंद झाले. प्रयोगाच्या खर्चाचा भार उचलणाऱ्या एखाद्या संस्थेने पुढाकार घेऊन असे आयोजन केल्यास कलाकारांनी मदत होऊ शकेल, असे ज्येष्ठ रंगकर्मी दीपक रेगे यांनी सुचवले.

लहान नाट्यगृहांत प्रयोग शक्य
पुणे शहरात अतिशय सुसज्ज अशी लहान आकाराची नाट्यगृहे आहेत. यामध्ये ज्योत्स्ना भोळे सभागृह, सुदर्शन रंगमंच यांसह अलीकडे उभ्या राहिलेल्या ‘द बॉक्स’, ‘द बेस’ यांसारख्या नाट्यगृहांचाही समावेश आहे. राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या हौशी कलाकारांना या नाट्यगृहांमध्ये परवडणाऱ्या खर्चात प्रयोग करणे शक्य आहे. बालनाट्य स्पर्धा किंवा हिंदी व संस्कृत स्पर्धेतील नाटकांना तर ते सोपे आहेच. मात्र दोन अंकी मराठी नाटकांमध्ये काही बदल करत त्यांचे प्रयोगही येथे करणे, शक्य आहे.

स्पर्धेव्यतिरिक्त प्रयोग केल्यास खर्च अधिक येतो किंवा प्रेक्षक येत नाही, असे रडगाणे गाण्यात अर्थ नाही. प्रयोगाचे गणित त्यासाठी आवश्यक आहे. सातत्याने नाटक केल्यास, त्याचा दर्जा उत्तम असल्यास प्रेक्षक नक्की येतातच. कमी खर्चात प्रयोग करणे सहज शक्य आहे. ते शक्य करण्यासाठी कलाकारांनी इच्छाशक्ती दाखवायला हवी.
- राहुल लामखडे,
दिग्दर्शक-अभिनेता

राज्य नाट्य स्पर्धेत उतरतानाच कलाकारांना आपण केवळ स्पर्धेसाठी नाटक करत नाही, याची कल्पना द्यायला हवी. त्यावेळीच पुढील प्रयोगांचे नियोजन केले, तर ते प्रत्यक्षात आणणे शक्य होते. याशिवाय स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या नाटकांना प्रयोगासाठी नाट्यगृहांनी काही सवलती दिल्यास त्यांना मदत होऊ शकेल.
- शौनक जोशी,
विद्यार्थी, फर्ग्युसन महाविद्यालय