राज्यात पाऊस लावणार हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पाऊस लावणार हजेरी
राज्यात पाऊस लावणार हजेरी

राज्यात पाऊस लावणार हजेरी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः गेल्या १२३ वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरलेल्या यंदाच्या फेब्रुवारी महिन्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत आहे. सध्या गुजरात व परिसरावर चक्राकार वारे सक्रिय असून वाऱ्यांच्या मधल्या थरात असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. परिणामी, राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२३ वर्षांमधील सर्वाधिक उष्ण होता. यंदा फेब्रुवारी महिन्यातील सरासरी कमाल तापमान २९.६६ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे यंदा फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल जाणवली. त्यामुळे महाराष्ट्रातील हा दुसरा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी महिना ठरला. या आधी सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी महिन्याची नोंद २००६ मध्ये झाली. त्यावेळी सरासरी कमाल तापमान ३२.१३ अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर यंदा सरासरी तापमान ३२.०४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
दरम्यान, कमाल व किमान तापमानातील वाढ कायम असली तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात येत्या बुधवारपर्यंत (ता. ८) वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद शनिवारी ब्रह्मपुरी येथे ३८.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे.

पुण्यातही पाऊस लावणार हजेरी
पुणे शहर आणि परिसरात दिवसा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. मात्र, येत्या सोमवारपासून (ता. ६) ढगाळ वातावरणासह मेघगर्जना व पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शहरात शनिवारी ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तर १६.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा किमान तापमानात वाढ झाली असून पुढील तीन ते चार दिवस शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. सोमवार (ता. ६) आणि मंगळवारी (ता. ७) पुणे परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

आज येथे पावसाची शक्यता
जालना, छत्रपती संभाजीनगर, नगर, अमरावती, अकोला, बुलडाणा, भंडारा, वाशीम, चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ.