कारागृहाची कवाडे संशोधनासाठी होणार खुली विद्यार्थ्यांना प्रवेश ः अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृहाची कवाडे संशोधनासाठी होणार खुली

विद्यार्थ्यांना प्रवेश ः अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे आदेश
कारागृहाची कवाडे संशोधनासाठी होणार खुली विद्यार्थ्यांना प्रवेश ः अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे आदेश

कारागृहाची कवाडे संशोधनासाठी होणार खुली विद्यार्थ्यांना प्रवेश ः अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः उंच दगडी भिंती, मोठमोठे दरवाजे आणि त्यासमोर बंदुकधारी पोलिस. कोणत्याही कारागृहाकडे पाहिल्यानंतर असे चित्र दिसते. कारागृहाच्या याच जाडजूड भिंतीमागे नेमके काय सुरू असते, याची सर्वसामान्यांना खबर नसते. कारागृहात बंदीजन नेमके काय करतात, त्यांची मानसिक स्थिती कशी आहे, त्यांच्यासाठी कोणते वेगळे प्रयोग राबविले जात आहे, या आणि अशा कित्येक प्रश्‍नांची उत्तरे कायम अनुत्तरीतच होती. आता मात्र त्या प्रश्‍नांची केवळ उत्तरेच मिळणार नाहीत, तर सामाजिक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात प्रवेश देऊन त्यांना संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक निर्णय राज्य कारागृह विभागाने घेतला आहे.

राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी संशोधनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध नोंदणीकृत संस्थांपासून विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कारागृहात जाऊन संशोधन करता येणार आहे. मात्र, त्यासाठी कारागृह अधीक्षकांकडे परवानगी अर्ज करावा लागणार आहे. परवानगी प्राप्त झाल्यानंतर नियम व अटींचे पालन करून, आक्षेपार्ह विषय वगळून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाची भेट घेता येणार आहे. विशेषतः सामाजिक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात प्रवेश देण्यात येणार आहे.

सध्या विविध विद्यापीठ व विधी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि समाजकल्याण अभ्यासक्रमासाठी कारागृहात भेट देतात. विविध विषयावर महाराष्ट्रातील तसेच देशातील विद्यापीठांमार्फत संशोधन करण्यात येते. कारागृहात कैद्यांसाठी सध्या विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळू शकेल. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कारागृहाची भेट मार्गदर्शक ठरू शकेल. टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय या संस्था कैद्यांवर संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत.

यांना मिळणार संधी
- सामाजिक संशोधन करणारे, विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी
- शैक्षणिक कारणास्तव महाविद्यालयांच्या जास्तीत जास्त ३५ विद्यार्थ्यांचा गट
- कारागृह अधीक्षकांकडे अर्ज केल्यानंतर मिळणार परवानगी
- नोंदणीकृत संस्था, विविध विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार संधी

नव्या आदेशामुळे होणारे फायदे
- कैद्यांच्या मानसिक व आरोग्याची सद्यःस्थिती कळेल
- विद्यार्थ्यांना थेट कारागृहातील प्रत्यक्ष माहिती मिळू शकेल
- विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कारागृह भेट ठरेल मार्गदर्शक
- बंदीजनांना कायदेविषयक साहाय्य, व्यवसायासाठी भविष्यात फायदा होण्याची शक्‍यता
- विद्यार्थ्यांच्या भेटीमुळे सकारात्मक बाजू पुढे येण्यास मदत
- संशोधन अहवालांमुळे सुधारणात्मक बदल घडविण्यास मदत

राज्याच्या विविध कारागृहांमध्ये असणाऱ्या कैद्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या, त्यांच्या भावनिक व मानसिक आरोग्यावर तपशीलवार संशोधन कारागृह विभागाच्या समन्वयाने करता येणार आहे. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे कारागृहातील सकारात्मक बाबी समाजासमोर नक्कीच येतील. त्याचबरोबर संशोधनातून येणाऱ्या अहवालांमुळे कारागृह प्रशासन, कैद्यांचे जीवनमानामध्ये महत्त्वाच्या सुधारणा, बदल घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भेटीचा नक्कीच उपयोग होईल.
- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य कारागृह विभाग.