रंग खेळल्यानंतर होणारा बेरंग टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग खेळल्यानंतर होणारा बेरंग टाळा
रंग खेळल्यानंतर होणारा बेरंग टाळा

रंग खेळल्यानंतर होणारा बेरंग टाळा

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : ‘‘रंग खेळायला खूप आवडतं. पण, त्यानंतर त्वचा आणि केसांनी लागलेला रंग काढता-काढता अक्षरशः नको होतं. काही जणांना रंगामुळे त्वचेला खाज येणे, पुरळ उठणे, लालसरपणा येणे असा त्रास उदभवू शकतो. डोळ्याजवळची त्वचा जास्त नाजूक असते. रंग खेळताना तो चुकून डोळ्यांत गेल्यास डोळे लाल होणे, पापण्या सुजणे, खाज येणे असा त्रास संभवतो. काही वेळा बुबुळाला त्रास होऊन गंभीर इजा संभवते. केसदेखील राट होतात. गरवारे महाविद्यालयीतल रूपाली भोसले बोलत होती. त्यावर, सल्ला देताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. धनश्री भिडे म्हणाल्या, ‘‘रंगही खेळायचा आणि त्वचा, केसही सुरक्षित ठेवायचे, तर त्यासाठी नैसर्गिक रंग वापरा.’’
होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. रस्त्या-रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये सकाळपासून रंगांची उधळण सुरू असते. पण, रंग खेळताना होणारा आनंद त्यानंतरही कायम ठेवण्यासाठी काही खबरदारीचे उपाय घेण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे रंग खेळल्यानंतरही त्वचाविकाराचा धोका कमी होईल.

रासायनिक रंग नकोच
रंग खेळताना पाण्याने सहज धुतला जाईल, अशा रंगांचा वापर करावा. इंडस्ट्रिअल रंग वापरणे टाळा. तसेच, मेटॅलिक रंग टाळा.

संपर्काचा वेळ कमी करा
रंग जितका वेळ त्वचेशी संपर्कात राहील, तितका रंगामुळे होणाऱ्या ऍलर्जीचा धोका वाढतो. त्यामुळे रंग खेळल्यानंतर तातडीने रंग धुऊन टाका.


रंग खेळण्यापूर्वी हे करा
- रंग खेळण्यापूर्वी त्वचेवर मॉयश्चरायझर लावा.
- खोबरेल तेल, तिळाचे तेल हे देखिल मॉयश्चरायझर प्रमाणे उपयुक्त ठरते. त्यामुळे रंग त्वचेच्या आतमध्ये जाण्याची शक्यता कमी होते. त्यातून रंगांमुळे त्वचेला होणारे दुष्परिणाम कमी करता येतात.

पूर्ण कपडे घाला
रंग खेळताना पूर्ण बाह्यांचा शर्ट, पँट किंवा कुर्ता घाला. त्यामुळे रंगाचा थेट त्वचेशी संपर्क होणार नाही.

त्वचेचा रंग असा काढा
त्वचेवर लागलेला रंग ब्रशने घासून अथवा खरखरीत टॉवेलने काढू नका. त्यातून त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. त्याऐवजी कोमट पाण्याने धुऊन काढावा.

हे टाळा....
- रंग डोळ्यात जाणार नाही, याची खबरदारी घ्या.
- चेहऱ्याला रंग लावणे टाळा.
- सिल्व्हर, ऑइल पेंटचा वापर करू नका.

रंग खेळताना त्वचेची काळजी घ्या. त्यासाठी आधी त्वचेवर मॉयश्चरायझर वापरा व पूर्ण कपडे घाला. केसांना तेल लावा. यामुळे एक आवरण तयार होईल व रंग कमी शोषला जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे टाळा. त्यातून त्वचा आणि केसांचे अधिक नुकसान होते. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करून रंग खेळण्याचा आनंद मिळवा.
- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ