
होलिका दहन आजच करा ः दाते
पुणे, ता. ५ : फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा होळी हा सण सोमवारी (ता. ६) महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. होळीच्या तयारीसाठी नागरिकांनी रविवारीच बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले.
यंदा सोमवारी (ता. ६) दुपारी चार वाजून १८ मिनिटांनी चतुर्दशी समाप्ती होत असून त्यानंतर पौर्णिमा सुरू होत आहे. होळी पौर्णिमेसाठी प्रदोष काळ महत्त्वाचा असून महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात पौर्णिमा असल्याने सोमवारी होलिका दहन करावे, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. तसेच, मंगळवारी (ता. ७) पौर्णिमा समाप्ती सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी असल्याने त्यापूर्वी सूर्यास्त होत असलेल्या प्रदेशात म्हणजे उत्तर प्रदेशमधील काही भाग, बिहार, ओरिसा, आसाम या भागात मंगळवारी होलिका दहन करावे, असेही दाते यांनी सांगितले आहे.