
ससून रुग्णालयात ‘ओबेसिटी मिशन’चा प्रारंभ
पुणे, ता. ५ : ससून रुग्णालयात ‘ओबेसिटी मिशन’ची सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे संपूर्ण राज्यात लठ्ठपणाबद्दल जनजागृती करण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत पुण्यात ससून रुग्णालयाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
ससून रुग्णालयातर्फे शालेय सहाशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एस. व्ही. युनियन प्रशाला, आगरकर प्रशाला, अत्रे दिन प्रशाला, मॉडर्न हायस्कूल अशा शैक्षणिक संस्थांमधील इयत्ता सातवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. या मुला-मुलींना लठ्ठपणाबद्दलची शास्त्रीय माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आली. लठ्ठपणाची कारणे कोणती, त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. तसेच, लठ्ठपणाला निश्चित प्रतिबंध करता येतो. त्यासाठीचे उपाय आणि ते कसे करावे याची माहितीही ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितली. यात डॉ. हरीश उम्रजकर, डॉ. हर्षल भितकर, डॉ. मीनल चंदनवाले, डॉ. पूनम संचेती, डॉ. चैतन्य गायकवाड आणि डॉ. शुभम चौधरी यात सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल माहिती देताना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘नियमित व्यायाम आणि चौरस आहार यातून लठ्ठपणा निश्चित टाळता येतो. या बाबतचे समुपदेशन आता ससून रुग्णालयात सहजतेने देण्यात येत आहे. तसेच, लठ्ठपणावरील विशेषोपचारही रुग्णालयात उपलब्ध आहेत.’’ ससून रुग्णालयातील ओबेसिटी मिशनचे नोडल ऑफिसर आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. हरीश उम्रजकर म्हणाले, ‘‘जगभरात २०३० पर्यंत लठ्ठ मुलांच्या एकूण संख्येत भारतीयांचे प्रमाण १० टक्के असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लठ्ठपणा या आजाराबाबत शालेय वयापासूनच जागृतीची गरज निर्माण झाली आहे.’’