
बनावट भाडेकरार करून घरमालकाची फसवणूक
पुणे, ता. ५ : वकिलाच्या मदतीने बनावट भाडेकरार करून घरमालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाडेकरू, त्याची पत्नी आणि नोटरी करणाऱ्या वकिलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बीना मधुकर सुरवडे (वय ६०, रा. गुरूनानकनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रियाज महम्मद हुसेन शेख (वय ५२), मुमताज रियाज शेख आणि सुधीर श्रावण सोनवणे (वय ५५, साईनाथ नगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज शेख हा भाडेकरू असून, त्याने फिर्यादीची सदनिका भाडेतत्त्वावर घेण्यासाठी १० फेब्रुवारी २०२२ ते ९ जानेवारी २०२३ पर्यंत ११ महिन्यांचा भाडेकरार केला होता. परंतु आरोपी शेख याने नोटरी करणाऱ्या वकिलाशी संगनमत करून ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर १२ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०२४ असा ६० महिन्यांचे बनावट भाडेकरारपत्र तयार करून घेतले. त्यात दस्तनोंदणी करताना या सदनिकेसाठी फिर्यादीला ३० लाख रुपये रोख रक्कम दिल्याचे नमूद केले. तसेच, फिर्यादी आणि त्यांचे पती मधुकर यांच्या बनावट सह्या करून फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.