यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिलपासून सुट्टीच्या काळात गाड्या रद्द होणार ः परगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिलपासून

सुट्टीच्या काळात गाड्या रद्द होणार ः परगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका
यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिलपासून सुट्टीच्या काळात गाड्या रद्द होणार ः परगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका

यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिलपासून सुट्टीच्या काळात गाड्या रद्द होणार ः परगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे. हे काम सुमारे २८८ दिवस चालणार आहे. ऐन उन्हाळाच्या सुट्टीत या कामास सुरुवात होत असल्याने सुट्टीचा बेत आखून परगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. ब्लॉकच्या काळात पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित होणार असून यात गाड्या रद्द करणे, मार्ग बदलणे, प्रवासाचे स्टेशन बदलणे, आदीचा समावेश असणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास मुहूर्त मिळत नव्हता. आता एप्रिलच्या अखेरीस रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. हडपसर व शिवाजीनगर स्थानकावरून रेल्वे गाड्या सुरू करणे हा त्याचाच एक भाग आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाच्यावतीने हे काम केले जाणार आहे. डीआरएम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल अखेरपासून काम सुरू केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

‘ब्लॉक’चा कालावधी कमी होणे गरजेचे
यार्ड रिमॉडेलिंग कालावधी तब्बल २८८ दिवसांचा आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा कालावधी कमी होणे गरजेचे आहे. डीआरएम इंदूराणी दुबे हे स्वतः ब्लॉकचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले नाही. या काळात रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडणार आहे. मात्र, ऐन सुट्टीत रेल्वे गाड्या रद्द होतील. त्याचा मोठा फटका प्रवाशांना व रेल्वेला बसणार आहे. मात्र, हे काम होणे हे देखील गरजेचे आहे.


पुणे स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग दृष्टिक्षेपात...
- २०१६-१७ मध्ये मिळाली मंजुरी
- ५२ कोटींचा खर्च अपेक्षित
- यंदाच्या अर्थसंकल्पात ३१ कोटींचा निधी मंजूर
- २६ आठवडे चालणार काम

पुणे स्थानकाची सद्यःस्थिती...
- दररोज प्रवास सुरू होणाऱ्या गाड्या : ७२
- १८ डबे असलेल्या गाड्या : ४२
- दररोज धावणाऱ्या गाड्या : २५०
- दररोजची प्रवासी संख्या : १ लाख ५० हजार
- एकूण फलाट : ६

एप्रिल महिन्याच्या अखेरीस यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होईल. हे काम सुमारे २८८ दिवस चालेल. ब्लॉकचे कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या कामामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. मात्र, हे काम होणे देखील आवश्यक आहे.
- इंदूराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.