
लोकवर्गणीतून खुली केली शालेय शिक्षणाची दारे
पुणे, ता. ७ : बालपण कधी जगातच आलं नाही... सातत्याने व्यवस्थेनं झिडकारलं...पोटभर खायला कधी मिळालंच नाही... तर कधी पोटाची भूक भागविण्यासाठी भीक मागावी लागली...पण, तरीही खचून न जाता वयाच्या अकराव्या वर्षातच त्यांच्या मनात सामाजिक कार्याची ज्योत पेटली. ‘शिक्षणातूनच परिवर्तन घडू शकते’, असा ठाम विश्वास असल्याने त्यांनी पारधी आणि भटक्या-विमुक्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी घरोघरी ज्ञानज्योत पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला.
विदारक आयुष्य वाट्याला येऊनही इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या सुनीता भोसले आजही खंबीरपणे प्रत्येक प्रसंगाला सामोऱ्या जात आहेत. ‘‘मी तीन वर्षांची असताना माझे वडील, काका आणि चुलती यांचा खून झाला. अशा वातावरणात आईवर मोठं सामाजिक दडपण टाकण्यात आलं. तरी तिनं आमच्या मनात सामाजिक कामाची ठिणगी पेटविली’’, असे सांगत सुनीताताई व्यक्त झाल्या.
पारधी आणि भटक्या-विमुक्त समाजातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा त्यांनी उचलला. जवळपास १५० मुलांसाठी लोकवर्गणीतून शालेय शिक्षणाची दारे त्यांनी खुली करून दिली. तर अनेक मुला-मुलींना उच्च शिक्षणाचे आकाश मोकळं करून दिली. खरंतर सहावीत असतानाच सुनीताताईंची शाळा सुटली. परंतु आता सामाजिक काम करताना शिक्षणाची गरज जाणवू लागल्याने त्यांनी पुन्हा शिकण्यास सुरवात केली असून त्या आता ‘बी.ए’च्या शेवटच्या वर्षात आहेत.
पुणे जिल्ह्यातील चव्हाणवाडी, कर्डे, कुरुळी, शिंदोडी, आंबळे, निमोणे, आलेगाव पागा अशा गावांमध्ये त्या काम करत आहेत. पारधी, भटक्या विमुक्त समाजातील महिला आणि बालकांसाठी त्या कार्यरत आहेत. त्यांनी ‘क्रांती’ या नावाने संस्था स्थापन केली. संस्थेद्वारे प्रत्येक कार्यकर्ता दोन-तीन गावांमध्ये काम करत असून त्यांच्या कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून पारधी समाजाबरोबरच भटक्या विमुक्त समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे. या मुलांसाठी लवकरच वसतीगृह बांधण्याचा मानस आहे. काम करताना यश-अपयशाचा विचार न करता शेवटपर्यंत काम करत राहणार आहे.
- सुनीता भोसले