महापालिकेकडून ‘हिरकणी कक्षा’ची हेळसांड सुरुच !

महापालिकेकडून ‘हिरकणी कक्षा’ची हेळसांड सुरुच !

पुणे, ता. ७ ः महापालिकेमध्ये विविध कामानिमित्त येणाऱ्या तसेच विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या हजारोंच्यावर आहे. मात्र, याच हजारो महिला, स्तनदा मातांसाठी आवश्‍यक ‘हिरकणी कक्षा’ची हेळसांड सुरु आहे. ‘हिरकणी कक्ष’ तिसऱ्या मजल्यावर हलविल्याचे कागदोपत्री दाखवून महिलांच्या भावनेशी खेळ मांडला जात आहे, तर दुसरीकडे पूर्वीच्या हिरकणी कक्षाच्या जागेत दिव्यांग कक्ष सुरु केल्याने महिलांची गैरसोय होत आहे.
महापालिकेने २०१६ मध्ये मुख्य इमारतीत हिरकणी कक्षाची स्थापना केली. त्यादृष्टीने महिलांकडून या कक्षाचा वापर केला जात होता. तर काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या समाजविकास विभागाने ‘हिरकणी कक्ष’ तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारी (जुने कॅन्टीन) स्थलांतरित केल्याचे पत्र दिले आहे. तर हिरकणी कक्षाच्या पूर्वीच्या ठिकाणी दिव्यांग कक्ष सुरु केल्याने महापालिकेत हिरकणी कक्ष नावालाच उरला आहे.
दरम्यान, महापालिकेतील हिरकणी कक्ष स्थलांतर केल्याची तक्रार सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी राज्य महिला आयोगाकडेही केली होती. या पत्राची दखल घेऊन महिला आयोगाने हा कक्ष पुन्हा कार्यान्वित करावा, त्याबाबतचा अहवाल तत्काळ महिला आयोगास पाठविण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. मात्र अद्यापही अंमलबजावणी झाली नाही.

हिरकणी कक्ष त्याच्या पूर्वीच्याच ठिकाणी आहे, तो कुठेही हलविला नाही. त्याच ठिकाणी दिव्यांग कक्ष आहे. हिरकणी कक्षामध्ये येणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी आहे, त्यातही स्तनदा माता तेथे येत नाहीत. याउलट दिव्यांग व्यक्ती या कक्षामध्ये येऊन बसतात.
- रामदास चव्हाण,
समाजविकास अधिकारी, महापालिका

महापालिकेतील हिरकणी कक्षाचा मोठा गोंधळ आहे. या कक्षामध्ये कुठलीही व्यवस्था नाही, सुरक्षिततेचा अभाव आहे. आता दिव्यांगांसाठीच या कक्षाचा वापर होतो. त्यामुळे महिला, स्तनदा माता यांच्यासाठी हिरकणी कक्ष आहे कुठे ? असा प्रश्‍न पडतो.
- वैशाली शेलार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com