
निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीला पोटगी देण्याचा आदेश
पुणे : निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीने स्वत:साठी व तीच्या मुलीच्या देखभालीसाठी पोटगीची मागणी केली होती. तिला दरमहा १५ हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आर. एम. काळे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
पूजा आणि कुणाल (दोघांची नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत. पती सारखे पैसे मागतो म्हणून त्यांच्यात सतत वाद होत होते. या वादातून पतीने तिला मारहाण करीत. पतीच्या वागण्यात बदल होत नसल्याने तिने नांदायला न जाण्याचा निर्णय घेतला, असे पूजा यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद आहे. त्यानंतर कुणाल यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पूजा यांनी अॅड. चंद्रसेन कुमकर आणि अॅड. नीलेश वाघमोडे यांच्यामार्फत पोटगीसाठी अर्ज दाखल केला. वाघमोडे यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून कौटुंबिक न्यायालयाने मुलीसाठी व पत्नीसाठी अनुक्रमे प्रतिमहिना सात व आठ हजार अशी पंधरा हजार पोटगी मंजूर करण्याचा आदेश दिला.