
पाणी क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी कार्यशाळा
पुणे, ता. ८ : पाणी क्षेत्रात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. घरात पाणी आल्यानंतर त्याचा जपून वापर केला पाहिजे. त्यासाठी महिलांनी जलसाक्षर होणे गरजेचे आहे, असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सेवानिवृत्त सहसचिव जयलक्ष्मी चेकल्ला यांनी बुधवारी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत ‘‘पाणी क्षेत्रात महिलांचा सहभाग’’ या विषयावर कार्यशाळा झाली. या वेळी आघारकर इस्टिट्यूटचे सेवानिवृत्त जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. कांतीमती कुळकर्णी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, माधवी दुबे, डॉ. सोनाली शिंदे, अंकीता यादव, सुजाता सावळे, प्रिती देशमुख, भाग्यश्री साहू यांच्यासह महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. या वेळी पाणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवापूर (नंदुरबार) तालुक्यातील बोकळझर येथील सुमन गावीत, बोरमणी (सांगोला) येथील अनिता माळगे यांना गौरव पुरस्कार, तर सुनिता केसकर, रूपाली कठरे यांना प्रशंसापत्र, दीपिका सोनी (बहादरपूर, मध्यप्रदेश), नंदा भुजबळ (शिक्रापूर), दीपाली पाटील (अटल भूजल विभाग) आदी महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, ‘‘पाणी जपून ठेवण्यासाठी खडक महत्त्वाचा आहे. भूजलाची प्रत कशी असते ही खडकावर अवलंबून असते. आपल्या राज्यात चांगल्या प्रतीचा खडक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. परंतु सध्याचा उपसा पाहता हे पाणी फार काळ टिकणार नाही. यासाठी भविष्यातील पिढ्यांसाठी पाणी राखून ठेवण्यासाठी या पाण्याचे योग्य ते नियोजन फक्त महिलाच करू शकतात.’ आयुक्त जोशी म्हणाले, ‘‘महिला या उत्तम मॅनेजमेंट गुरू असतात. त्यामुळे आपले घर, व्यवसाय, करिअर उत्कृष्टपणे पार पाडलेल्या महिलांनी पाणी क्षेत्राकडेसुद्धा मोठ्या प्रमाणात वळण्याची गरज आहे. पाणी वाचवताना आपल्या मुलांवर पाणी बचतीचे संस्कार केले पाहिजेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या उपसंचालक भाग्यश्री मग्गीरवार यांनी प्रास्तविक केले. भूवैज्ञानिक सुवर्णा शितोळे यांनी आभार मानले.
फोटो
PPRTT23B09595