
अवकाळीचा सात तालुक्यांना फटका
पुणे, ता. ८ : पुणे जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सात तालुक्यांना बसला असून एकूण ४४.३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर इंदापूर येथे वीज पडून १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अवकाळी पावसाचा हवेलीसह मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांना फटका बसला. त्यापैकी आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १८.२० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. हवेलीमध्ये ०.८० मिमी, मुळशीमध्ये १.१७ मिमी, मावळमध्ये ८.७३ मिमी, जुन्नरमध्ये ६ मिमी, खेडमध्ये ४ मिमी आणि शिरूरमध्ये ०.४४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कृषी व महसूल विभागाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील दोन गावांत द्राक्ष, कांदा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर खेड तालुक्यातील २० गावांमधील शेतीचे नुकसान झाले आहे. या २० गावातील ३८.५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने गहू, आंबा आणि भाजीपाला यांचा समावेश आहे. इंदापूर येथील कटी या गावात मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वीज पडून ओंकार दादाराव मोहिते (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती मागवली आहे. तसेच तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवालात तीन तालुक्यातील फळपीकांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप सविस्तर अहवाल तयार झालेला नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदारांना पंचनाम्याच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून गुरुवारी दुपारपर्यंत नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष नुकसानाची आकडेवारी समोर येईल.
- धनंजय जाधव, उपजिल्हाधिकारी, गृहशाखा