महिला दिन, पौष्टिक तृणधान्य वर्ष हा सुरेख संगम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन, पौष्टिक तृणधान्य वर्ष हा सुरेख संगम
महिला दिन, पौष्टिक तृणधान्य वर्ष हा सुरेख संगम

महिला दिन, पौष्टिक तृणधान्य वर्ष हा सुरेख संगम

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी आणि महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले. राज्य कृषी आयुक्तालय आणि विभागीय माहिती कार्यालयातर्फे शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

कृषी आयुक्त चव्हाण म्हणाले, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकल्पनेनुसार सर्व महिलांना डिजिटल साक्षर करण्यासह त्यांच्या सर्वसमावेशक विकासाचे काम करणे अपेक्षित आहे. भारताच्या प्रयत्नामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. भरडधान्य पौष्टिक असल्याने महिलांनी कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांचा वापर करावा. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कृषी विस्तार प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषी संचालक दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.

माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर म्हणाले, महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचे आर्थिक, मानसिक स्थैर्य तसेच आरोग्यासाठी नेहमी झटत असते. या उपक्रमाच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व महिलांपर्यंत पोचवण्याचे काम करण्यात येत आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रम
आंतरराष्ट्रीय महिलादिनी शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये असा आगळावेगळा स्वागत सोहळा प्रथमच होत आहे. या स्वागत सोहळ्यामुळे मनस्वी आनंद झाला, अशी प्रतिक्रिया महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांनी कृषी आयुक्तालय आणि विभागीय माहिती कार्यालयाचे आभार मानले.