वीज ग्राहकांची थकबाकी १ हजार ९५० कोटींवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज ग्राहकांची थकबाकी १ हजार ९५० कोटींवर
वीज ग्राहकांची थकबाकी १ हजार ९५० कोटींवर

वीज ग्राहकांची थकबाकी १ हजार ९५० कोटींवर

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील अकृषक वर्गवारीतील वीज ग्राहकांची थकबाकी १ हजार ९५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक थकबाकी पथदिव्यांची आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदार ग्राहकांनी थकबाकी तत्काळ भरण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले.

पुणे प्रादेशिक विभागातील १६ लाख घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर ग्राहकांकडे सुमारे १ हजार ९५० कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहेत. त्यामुळे महावितरणला ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात अडचणी येत आहे. परिणामी, थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

या थकबाकीत सर्वांत मोठा आकडा हा सार्वजनिक पथदिवे योजनेचा असून २१ हजार ६०४ पथदिवे योजनेकडे १ हजार १८८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या १० हजार ७४७ ग्राहकांकडे ४२० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण १३ लाख ६२ हजार ३२९ घरगुती ग्राहकांकडे १७० कोटी रुपयांची थकबाकी असून एक लाख ४० हजार ६८८ वाणिज्यिक ग्राहकांकडे ५४ कोटी रुपयांची व ३९ हजार ३१० औद्योगिक ग्राहकांकडे ८२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

बिल भरण्याचे आवाहन!
ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला रोजच वीज विकत घ्यावी लागते. यासाठी वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना रोजच पैसे द्यावे लागते. थकबाकीमुळे महावितरणला महागड्या व्याजाने कर्ज काढून वीजनिर्मिती कंपन्यांना घेतलेल्या विजेचे पैसे अदा करावे लागत आहे. परिणामी, विजेचे दर वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन अंकुश नाळे यांनी केले आहे.