
घरपोच दालखिचडीतून दीड कोटी उलाढाल
पुणे, ता. १० : भूक लागली आहे पण पोळी-भाजी बनविण्यासाठी वेळ नाही. किंवा जेवणच बनवता येत नाही. मेसला सुटी असल्याने काय जेवण करायचे असा प्रश्न पडतो. चिप्स, मॅगी किंवा फास्ट फूड खाऊन कंटाळा आला आहे. जवळ कोणते हॉटेल नाही. असे प्रसंग अनेकदा येत असतात. अशा वेळी अनेकांची दाल खिचडीला पसंती मिळते. त्यामुळे इंस्टेंट दालखिचडी पुरविण्याचा व्यवसाय सुरू करू. त्यातून अनेकांना चांगले अन्न पुरवता येर्इल व व्यवसाय देखील वाढेल, अशी कल्पना नोएडा येथील एका महिलेने लढवली आहे.
झोमॅटो, स्वीगी यासारखा फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्लॅटफार्मच्या माध्यमातून या स्टार्टअपने आत्तापर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. एवढेच नव्हे तर या स्टार्टअपने अनेकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. ‘भात.इन’ (Bhaat.in) असे या स्टार्टअपचे नाव आहे. रंजना श्रीवास्तव यांनी मार्च २०१८ मध्ये स्टार्टअपची स्थापना केली. रंजना या रासायनिक अभियंता असून त्यांनी ‘आयआयएमए’मधून पदवी प्राप्त केली आहे.
अशी सुचली कल्पना
शिक्षण आणि कामाच्या निमित्ताने रचना यांचा २५ हून अधिक राज्य आणि विविध देशांत प्रवास झाला आहे. या दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची चव चाखली. यात त्यांनी अनेक ठिकाणी दालखिचडी देखील खाल्ली. प्रवासात जेवणाचे हाल होतात. अशा वेळी दालखिचडी चांगला पर्याय ठरू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या स्टार्टअपची सुरवात केली.
सर्वाधिक मागणी पुणे-मुंबर्इतून
या स्टार्टअपचे नोएडामध्ये क्लाऊड किचन आहे. त्याच्या माध्यमातून त्या परिसरात तयार केलेली दाल खिचडी झोमॅटो, स्वीगी यासारख्या फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून पुरवली जाते. त्यातून स्टार्टअपची दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांची उलाढाल होत आहे. तर नुकतेच सुरू करण्यात आलेल्या रेडी टू इट उत्पादनांच्या माध्यमातून आतापर्यंत १० लाख रुपयांचा व्यवसाय झाला आहे. या पदार्थांना सर्वाधिक मागणी ही मुंबर्इ आणि पुण्यातून आहे. त्यानंतर कर्नाटक, केरळमधून ऑर्डर येत आहेत, अशी माहिती रंजना यांनी दिली.
कोरोना काळात क्लाऊड किचनची संकल्पना मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातून अनेकांचे व्यवसाय वाढले आहेत. आत्ता देखील त्याला पसंती आहे. चांगले खाद्यपदार्थ कुठे मिळेल, याचा खवय्ये नेहमी शोध घेत असतात. मात्र या सर्वांत अनेकांची खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावर भर आहे. त्यामुळे आज नागरिक चहा देखील ऑर्डर करीत आहेत. चांगले पदार्थ मिळतात हे समजले तर नागरिक सातत्याने ऑर्डर देत असतात.
- रचना श्रीवास्तव, संस्थापक, भात.इन