खडकवासला धरणावरील जलविद्युत प्रकल्प पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला धरणावरील जलविद्युत प्रकल्प पूर्ण
खडकवासला धरणावरील जलविद्युत प्रकल्प पूर्ण

खडकवासला धरणावरील जलविद्युत प्रकल्प पूर्ण

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : विविध कारणांमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारण्यात आलेला जलविद्युत प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची चाचणीही यशस्वी झाली असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. धरणाच्या मुठा उजवा कालव्यातून सिंचनासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याबाबत २००६ मध्ये राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली होती. त्यानुसार या प्रकल्पात ६०० किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने डिसेंबर २०१० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कालवा बंद करून खोदाईचे काम करण्यास कंपनीला परवानगी मिळाली नाही. त्यानंतर कोरोना आणि त्यानंतर कामगारांची वानवा या व अशा कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्याची चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्याकडून परवानगी घेण्यात येत असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

सहा महिने वीजनिर्मिती शक्य
वीजनिर्मितीसाठी खडकवासला धरणात सुरुवातीलाच पॉवर हाऊस बांधण्यात आले आहे. पाणी सोडल्यानंतर या पॉवर हाऊसमध्ये जनित्रांद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. वीज तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाईल. खडकवासला धरणातून कालव्यात वर्षभरात १७० दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे वर्षातील सहा महिने या प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. वीज तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मितीला विकत देण्यात येणार असल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.