प्राध्यापकांची ८२२ पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राध्यापकांची ८२२ पदे रिक्त
प्राध्यापकांची ८२२ पदे रिक्त

प्राध्यापकांची ८२२ पदे रिक्त

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः महाराष्ट्रातील प्राध्यापकांची ६० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असून, महाविद्यालयांतील शैक्षणिक डोलारा पूर्णतः कोसळला आहे. गंभीर बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील तब्बल ८२२ अनुदानित प्राध्यापकांची पदे रिक्त असून, सर्वच प्रकारच्या रिक्त पदांची संख्या काही हजारांत असल्याची माहिती शिक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. संदीप पालवे यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना विद्यापीठाने ही आकडेवारी घोषित केली आहे. मागील १२ वर्षांपासून प्राध्यापकांची भरती प्रक्रिया खंडित झाली असून, रिक्‍त पदांमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबतीत महाविद्यालयांची प्रचंड ओढाताण होत आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेला तिलांजली दिली जात आहे. राज्य सरकारने भरतीची घोषणा केली मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीत तफावत दिसत आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी माहिती देताना म्हणाले, ‘‘तीनही जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या प्राध्यापकांची रिक्त पदांची संख्या १० हजारांपेक्षाही जास्त आहे. त्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे.’’ चार वर्षांची पदवी, आंतरविद्याशाखीय शिक्षा प्रणाली आणि नवीन शैक्षणिक धोरणांच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अपुरे मनुष्यबळ निश्चितच घातक ठरणार आहे.

परिणाम काय?
- अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया पूर्णतः कोलमडली
- प्राध्यापकांवर प्रशासकीय कामे करण्याची वेळ
- तात्पुरत्या स्वरूपात आणि अत्यंत कमी पगारात प्राध्यापकांची नेमणूक
- अध्यापनाबरोबरच संशोधन प्रक्रियाही खंडित
- शिक्षणाचा दर्जा ढासळला, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले
- प्राध्यापकांना विविध ताणतणावाचा सामना करावा लागत आहे
- नवीन शैक्षणिक धोरण राबविणार कसे, हा मोठा प्रश्न

विद्यापीठातही भीषण स्थिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ४२ विभागांमध्ये तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. यासंबंधी डॉ. योगेश भोळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठाचा प्रशासन शिक्षक विभाग म्हणतो, ‘‘सर्व विभागांमध्ये आवश्यक असणारी कायम स्वरूपाच्या जागा पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. पदभरतीसाठी सरकारी मान्यता प्राप्त झाली असून, भरती प्रक्रियेची कार्यवाही चालू आहे.’’


विद्यापीठ विभागांतील रिक्त पदे
पदे ः एकूण पदे ः रिक्त पदे
प्राध्यापक ः ७० ः ५६
सहयोगी प्राध्यापक ः ११७ ः ८२
सहायक प्राध्यापक ः १९६ ः ७६
एकूण ः ३८३ ः २१४

नवीन शैक्षणिक धोरणाचे सोडा, साधे नियमित अध्ययन आणि अध्यापनही रिक्त पदांमुळे प्रभावित झाले आहे. महाविद्यालयांत अभ्यासक्रमही नीट शिकविता येत नाही. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, सरकारकडून सातत्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रभावी शिक्षकांची नवी पिढीच यामुळे तयार होत नाही.    
- प्रा. डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड  

सरकारने २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या अध्यादेशानुसार २०२२-२३ पर्यंत ही पदे भरणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही ही पदे रिक्त आहे. शिक्षकेतर कर्मचारीही कमी झाले असून, प्राध्यापकांना सर्वच प्रकारचा ताण सहन करावा लागत आहे. शैक्षणिक कामगिरीवर याचे विपरीत परिणाम होत असून, तातडीने प्राध्यापक भरती करणे
आवश्यक आहे.
- डॉ. संदीप पालवे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------