
‘छिन्नमनस्कता’बाबत समुपदेशन करताना
पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनसाठी (SAA) वरिष्ठ समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या कादंबरी कुलकर्णी यांनी मानसिक आरोग्याबाबत महिलांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. कोंडलेल्या भावनांना जवळच्या व्यक्तींसमोर वाट करून देण्याचे महत्त्व त्या सांगतात. विविध प्रसंगी जाणवलेल्या आपल्या विविध प्रकारच्या भावना दैनंदिनीत मांडून, त्या आधारे मनाच्या तब्येतीची वेळोवेळी दखल घ्यायचा सल्ला त्या देतात.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘विचार, भावना आणि वर्तन यांच्यातील बिघाड खिन्नमनस्क व्यक्तीत जाणवतो. बरेचदा हे अल्प प्रमाणात असते. तोच धोक्याचा इशारा समजून उपचार सुरू केल्यास परिस्थिती बिकट होत नाही. या संदर्भात लोकांमधले गैरसमज दूर करत जागरूकतेचा प्रसार व अशा व्यक्तींना समुपदेशनाचे काम आमची संस्था करते. या विकारात भास व भ्रम होतात. प्रत्यक्षात नसलेले काही आवाज अशा माणसांना ऐकू येतात किंवा दृश्य दिसतात. भ्रमाची अवस्था म्हणजे भूत अंगात आल्यासारखे वेगळेच वर्तन व्यक्ती करते. कुणी आपल्याबद्दलचच बोलत आहेत किंवा कट रचत असल्याच्या धारणेने बेचैन होतात. परिस्थिती हाताबाहेर गेली की, काहीसे हिंसक वर्तन घडू शकते. दुसऱ्यांना अथवा स्वतःला ते इजा करू शकतात. आपल्या अवतीभवती जर एखाद्याच्या वर्तनात बिघाड दिसला, सतत नकारात्मकतालक्षणे दिसली तर वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.’’
कुलकर्णी यांनी सांगितले की, मेंदूतील रासायनिक असंतुलन, आनुवंशिकता किंवा व्यसने आदींमुळे आधी प्रचंड निराशा, खिन्नता व नंतर दैनंदिन स्वच्छतेबाबत उदासीनता अशा चढत्या क्रमाने लक्षणे दिसू शकतात. समाजात मिसळत असलेली व्यक्ती अचानकच लोकांपासून दूर राहू लागते. अनावश्यक चिडचिड, कामातील उत्साह निघून जाणे, प्रसंगानुरूप भावना व्यक्त करायला न जमणे, चिंता, भीती, साशंकता, काही वेळा स्वतःशीच बडबड आदी लक्षणे दिसताच अशांना जास्तीत जास्त समजून घेतले पाहिजे. त्यांची टिंगल न करता, तदनुभूतीने (empathy) त्यांना काय वाटते आहे; ते सभोवतालच्यांनी जाणून घ्यायला हवे. काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर अकारण चिडचिड, निराशा, आत्मविश्वास कमी होणे दिसते. आपल्यातील स्त्रीत्व संपते आहे की काय, अशा भावनेने त्या पछाडल्या जाऊ शकतात. यासाठी कौटुंबिक सदस्यांनी सजग राहायला हवे. तिच्या मनातील भीती, संशय, अपराधीपणा, निरुत्साह आदी दूर करण्याचा व तिला उमेद देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. महिलांनी वेळोवेळी आपले मन मोकळे करण्यासाठी जवळच्या माणसांशी हितगूज करावे. समविचारी महिलांचा स्वमदत गट सुरू करावा. हवे तर आमच्या केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दैनंदिनीत भावनांचे कल्लोळ नोंदून ठेवावे. हे लिहिण्यानेही वेदनेचा निचरा होऊ शकतो. नियमित नोंदींच्या आधारे स्वतःच्या भावनिक आरोग्याचा ताळेबंद लक्षात घेता येतो.