विशेष मुलांसाठी वडकीत बागेची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांसाठी वडकीत बागेची निर्मिती
विशेष मुलांसाठी वडकीत बागेची निर्मिती

विशेष मुलांसाठी वडकीत बागेची निर्मिती

sakal_logo
By

पुणे, ता. १० : विशेष मुले, व्यक्ती यांना अनेकदा आवाज, दृश्य, गंध, चव आणि स्पर्श अशा पाच ज्ञानांची अनुभूती घेताना अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेत विशेष मुले, व्यक्ती यांच्यामध्ये पंचज्ञानांची जाणीव वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने पुण्यातील उमेद परिवारातर्फे वडकी गाव येथे एका विशेष बागेची उभारणी केली आहे.

या विशेष बागेचे लोकार्पण नुकतेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल अनिल परमार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मोहन पालेशा, संतोष मराठे, उमेद परिवाराचे अध्यक्ष रमेश वांद्रे, सचिव राजेंद्र नहार, विश्वस्त सुभाष रावल आणि प्रवीण छाजेड उपस्थित होते.

या वेळी नहार म्हणाले, ‘‘विशेष मुले, व्यक्तींमध्ये जाणीव, क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने बागेची निर्मिती केली आहे. यासाठी टाटा ब्ल्यूस्कोप लिमिटेड, पुणे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. बागेच्या रचनाकार आर्किटेक्ट स्नेहल ओसवाल या आहेत. येथे सर्वांना प्रवेश विनामूल्य असून, ही बाग सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत खुली असेल.’’

बागेची वैशिष्ट्ये
बागेमध्ये आवाज, दृश्य, गंध, चव आणि स्पर्श यांच्या अनुषंगाने विविध घटकांचा समावेश केला आहे. विशेष व्यक्तींना आवाजाची ओळख व्हावी, यासाठी विविध प्रकारच्या घंटा येथे लावण्यात आल्या आहेत. गंधाची जाणीव व्हावी यासाठी विविध प्रकारची फुलझाडे तर चवीची जाणीव होण्यासाठी तुळस, कडुनिंब यांसारखी औषधी झाडे लावली आहेत. या झाडांच्या पानांद्वारे ते विविध चवींची अनुभूती घेऊ शकतील. त्याचबरोबर स्पर्श हा घटक लक्षात घेत, बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या फरशांचा समावेश केला आहे. त्यामुळे खडतर, थंड, गुळगुळीत असे स्पर्श समजण्यास त्यांना मदत होईल. तर दृष्टी या घटकाच्या अनुषंगाने बागेत फायबरच्या काही शीट लावण्यात आल्या असून, त्याद्वारे प्रकाश परावर्तित होऊन रंगांच्या विविध छटा त्यावर दिसतील.