शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा मानस ः केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांची ३० हजार पदे 
भरण्याचा मानस ः केसरकर
शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा मानस ः केसरकर

शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा मानस ः केसरकर

sakal_logo
By

पुणे, ता. १० : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील एकूण ६५ हजार १११ इतकी शिक्षकीय पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांची ही दरी कमी करण्यासाठी राज्यात लवकरच सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे भरण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा अधिवेशनादरम्यान ‘राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत’ विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी ही माहिती दिली. राज्यात सध्या ६५ हजार १११ इतक्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासकीय आश्रमशाळेत एक हजार ५४६, अनुदानित आश्रमशाळेत ७२२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या शाळांमध्ये २०२१-२२ च्या संच मान्यतेप्रमाणे भिवंडी मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील एकूण ४० पदे रिक्त आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०११ ते २०१९ या कालावधीत एकूण ३६४ पदे भरण्यात आली असून, सध्या ६५१ पदे रिक्त आहेत, अशीही माहिती प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी सांगितली. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ची परीक्षा नुकतीच झाली आहे. त्यानुसार राज्यात अंदाजे तीस हजार शिक्षकांची पदे भरणार असल्याचेही त्यांनी उत्तरात नमूद केले आहे.
प्रत्यक्षात जवळपास ८० ते ९० हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी राज्य सरकारने एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा तातडीने भरणे आवश्यक आहे, असे डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.