
पाण्याबाबत लोकजागृतीचा अखंड प्रयास
पुण्यातील विलास कुलकर्णी यांनी पाण्याचे महत्त्व लोकांना जाणवून देण्याचा ध्यास घेतला आहे. पावसाच्या पाण्याची साठवण, ग्रामीण भागातील जल व्यवस्थापन, शहरांतील पाणी प्रदूषणाची कारणे व शुद्धीकरणाचे उपाय आदींबाबत ते ‘शाश्वत इको-सोल्युशन’ या संस्थेच्या संचालक पदावरून भरीव काम करतात.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘प्रदूषित पाणी तसेच सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी वेगवेगळ्या लोकांनी तयार केलेल्या तंत्रांचा वापर करणे व त्या संदर्भात येणाऱ्या समस्या सोडवण्याचे काम मी करतो. गावोगावी पाण्याचे साठे कमी होत असून, लोकसंख्या वाढत आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणी रहायला जातात. त्यांच्या वापरातील सांडपाणी प्रक्रिया न होता वाहत जाऊन मुख्य जलाशयात मिसळते. यामुळे जलाशयातील पाण्याची गुणवत्ता कमी होऊन त्याला दुर्गंधी येते. रंग बदलतो. ते पिण्यायोग्य राहत नाही. मी ते पिण्यायोग्य करण्यासाठी पर्यावरणपूरक व किफायतशीर पद्धतीने शुद्धीकरण करतो. सार्वजनिक आरोग्याबाबत केंद्रीय प्रकल्पांतर्गत मार्गदर्शक तत्त्वांचे निकष पाळून मी हे करतो. यात सेंद्रीय पदार्थांचा वापर, शुद्धीकरण प्रक्रियेत निघालेल्या गाळाचा शेती अथवा बागेसाठी पुनर्वापर आणि पाण्याची बचत आदींची काळजी घेतो.’’
कुलकर्णी यांनी असेही सांगितले की, दहा वर्षांपासून आमचे आळंदीत काम सुरू आहे. येथील पाणीपुरवठा यंत्रणेला आम्ही जलशुद्धीकरण तसेच यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानात्मक बदल घडवण्यासाठीही सेवा देत आहोत. राजगुरुनगर, शिरूर, नागपूर, धुळ्याजवळचे साकेगाव, औरंगाबाद वगैरे ठिकाणीही जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी आम्ही तेरा-चौदा वर्षे काम करत आहोत. उन्हाळ्यात पाणी प्रदूषणाची समस्या असते. पावसाळ्यात चांगले पाणी जलसाठ्यांत आल्याने ती सुटते. पावसाळा संपल्यावर पुन्हा प्रदूषण होऊ लागते. त्या त्या प्रकल्पातील प्रदूषित पाणी विशिष्ट रसायनांच्या साह्याने निर्जंतुक करणे, त्यात आवश्यक ती खनिजे ठराविक प्रमाणात मिसळणे वगैरे पद्धतीने आम्ही पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतो. अठ्ठावीस प्रकल्पांसाठी आम्ही काम केले आहे. यात अजय कदम यांच्यासह आणखी काही सहकाऱ्यांची मोलाची मदत मिळते.