नद्यांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक

नद्यांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक

पुणे, ता. ११ : ‘‘देशातील सर्व नद्या हृदयरोगाने आजारी असून त्यांच्यावर त्याप्रमाणेच उपचारांची गरज आहे. पण असे असतानाही सध्या नद्यांवर ‘ब्युटी पार्लर’ किंवा दंतवैद्यकीय पद्धतीचे केवळ सौंदर्य वाढविणारे उपचार केले जात आहेत. खरंतर नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे,’’ असे परखड मत भारताचे जलपुरूष अशी ओळख असणारे आणि तरुण भारत संघाचे संस्थापक डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
भारत ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवीत असताना ‘द सत्संग फाउंडेशन’तर्फे आणि ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्यातून ‘सिव्हल २०’ गटातील सदस्यांसाठी ‘नद्यांचे पुनरुज्जीवन आणि पाणी’ या विषयावर दोन दिवसीय जल परिषद पुण्यात आयोजित केली आहे. या जलपरिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सिंह बोलत होते. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री एम, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, माता अमृतानंदमयी मठाचे उपाध्यक्ष स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी, ‘सी २०’चे मुख्य समन्वयक विजय नंबियार, अभिनेता चिन्मय उदगीरकर या मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करून परिषदेचे उद्‌घाटन झाले. देशातील १२ प्रमुख नद्यांमधील पाणी कलशात एकत्रित केले होते.
डॉ. सिंह म्हणाले, ‘‘आपली संस्कृती, अध्यात्म हे नदीशी जोडलेले आहे. देशात एकही नदी अशी नाही, जिथे मंदिरे, गुरुद्वारा नाहीत. प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच वसलेल्या आहेत. ‘तुम्ही नद्यांना थांबवू शकत नाही’ असे अथर्व वेदात अधोरेखित केले आहे. पण, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे.’’
ही परिषद भरविण्यामागील पार्श्वभूमी सांगताना श्री एम म्हणाले, ‘‘पाण्याशिवाय जीवनाचा विचार आपण करू शकत नाही. त्यामुळे पाणी नाही; तर जीवन नाही. झाडे नाही, तर पाणीही नाही, हे समजून घेतले पाहिजे. म्हणून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे.’’
नंबियार म्हणाले, ‘‘जी २० परिषद ‘वसुधैव कुटुंबकम्’ तत्त्वावर काम करत असून त्यासाठी ‘सी २०’द्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जल परिषदेच्या निमित्ताने विविध देशांतील नद्यांवर काम करणाऱ्या संस्थांना एकत्रित करून मंथन घडवून आणले आहे.’’ या वेळी अमृतानंदमयी यांचा संदेश वाचून दाखविला.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.....
- लोकसहभागातून जलसंवर्धन आवश्यक
- आम्ही, जवळपास १३ हजार ८०० जलस्रोत लोकसहभागातून पुनरुज्जीवित केले. त्याद्वारे तब्बल १७ लाख लोकांना रोजगार मिळाला
- पाण्याचे संकट ही जागतिक समस्या असली, तरी त्यावरील उपाय हा स्थानिक आहे
- आपल्याकडे कमी वेळात जास्त पाणी उपसा व प्रदूषण करणारे आहेत, परंतु जलसंवर्धकांची कमतरता आहे
- आधुनिक शिक्षण पद्धती माणसाला स्वार्थी बनवत आहे
- देशात १७ राज्ये आणि ३६५ जिल्ह्यांना पाणी टंचाई, दुष्काळाने ग्रासले आहे
- आपल्याकडील ३० टक्के जमीन पुराखाली, तर ६० टक्के जमीन दुष्काळाखाली आहे
- नदीचा प्रवाह सुरक्षित राहण्यासाठी कुंभ मेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे


जगातील चार टक्के ताज्या पाण्याचे स्रोत हे भारतात आहेत. शेती, उद्योग, ऊर्जा निर्मितीसाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मरणासन्न नद्या, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा, भूजल उपसा अशा समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर उपाय शोधले पाहिजेत. नद्यांवर काम करणाऱ्या विविध समित्या, ‘रिव्हर वॉक’ यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना नदीशी जोडण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
- विजय नंबियार,
मुख्य समन्वयक, ‘सी २०’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com