पुणे संथ, वाहतुकीचा वेग @ १९ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे संथ, वाहतुकीचा वेग @ १९
पुणे संथ, वाहतुकीचा वेग @ १९

पुणे संथ, वाहतुकीचा वेग @ १९

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना एक चिंताजनक बाब समोर आली आहे. वाहतूक वेगात बंगळूरनंतर पुण्याचा देशात दुसरा क्रमांक लागत असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवास करताना १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी २७ मिनिटांचा वेळ जात आहे. तसेच या वाहतूक कोंडीत वर्षाकाठी पुणेकरांचे २४९ तास वाया जात असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
पुणे शहरातील वाहतुकीसंदर्भात एका खासगी संस्थेने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला असून, पुणे हे जगातील सहावे, तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदगामी शहर असल्याचे म्हटले आहे. या संस्थेने २०२२ मध्ये जगातील ५६ देश व त्यातील ३८९ शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास करून वार्षिक वाहतूक कोंडीचा निर्देशांक सांगणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी केवळ वाहतूक कोंडीच नाही, तर त्यावर होणारा इंधनांचा खर्च, वेळेचा अपव्यय, तसेच प्रदूषण यावरदेखील बोट ठेवले आहे. या अहवालानुसार पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणापासून दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी सरासरी २७ मिनिटांचा वेळ लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात १ मिनिट १० सेकंदांची वाढ झाली आहे. हे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे, असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे.

काय सांगतो अहवाल
- ‘टॉमटॉम’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक
- विस्तारणाऱ्या शहरांचा केवळ वाहतुकीवरच नाही, तर शहरातील अन्य घटकांवरदेखील परिणाम
- पेट्रोलच्या वापरात भरीव वाढ, २०२१ च्या तुलनेत पेट्रोल खर्चात २७ टक्क्यांनी वाढ
- प्रवासाच्या वेळेत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाहतूक वेग मंदावलेली शहरे
शहराचे नाव-प्रवासाचा वेळ (१० किमी)-सरासरी वेग-वर्षातील वाहतूक कोंडीचे तास
१. बंगळूर-२९ मिनिट १० सेकंद-१८ किमी-२६०
२. पुणे-२७ मिनिट २० सेकंद-१९ किमी-२४९
३. दिल्ली -२२ मिनिटे--- किमी-१९६
४. मुंबई-२१ मिनिटे------किमी- १९०

काय आहेत कारणे
१. अरुंद रस्ते
२. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारे वाहनांचे पार्किंग
३. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसणे
४. रस्त्यावरील फेरीवाले, पथारी
५. विविध ठिकाणी सुरू असलेली विकासकामे

तज्ज्ञ काय म्हणतात
पुण्यात खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. खासगी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आवश्यक आहे. जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी व मेट्रोचा विस्तार झाला पाहिजे. तसेच पार्किंगचे नियम कडक केले पाहिजेत किंवा पार्किंगच्या दरात वाढ केली पाहिजे. म्हणजे खासगी वाहनांचा वापर कमी होईल.
- प्रांजली देशपांडे, रस्ते वाहतूक तज्ज्ञ

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खात्रीलायक बनली पाहिजे. ते झाले तर खासगी वाहनांची संख्या कमी होईल. तसेच नवीन बांधकाम करताना ‘डीसीआर’ (विकास नियमावली) नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यामुळे खासगी इमारतीच्या पार्किंगमध्येदेखील अन्य वाहनांना पार्किंग करता येईल. परिणामी रस्त्यावरील पार्किंगची समस्या दूर होईल.
- संजय ससाणे, निवृत्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे