राज्यात पावसासाठी पोषक वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः नव्याने निर्माण झालेले पश्‍चिमी चक्रावात, त्यात पश्‍चिमेकडून वाहणारे वारे तसेच, उत्तर बिहार ते कर्नाटकपर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम शहर व परिसरावर होणार असून अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच मंगळवारपासून (ता. १४) दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
शहरात आज ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांपासून शहरात दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. मात्र, यातून पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. शहर आणि परिसरात सोमवारपासून (ता. १३) ढगांचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. तर बुधवारपासून (ता. १५) पुणे व परिसरात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ही स्थिती शनिवारपर्यंत (ता. १८) अशीच कायम राहू शकते, असे हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी सांगितले.
राज्यात उन्हाचा कडाका जाणवत असून कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. दरम्यान, पावसासाठी अनुकूल वातावरणामुळे सोमवारपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. राज्यात शनिवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबईत उष्णतेची लाट आली होती. राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सांताक्रुझ येथे ३८.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. हे तापमान सरासरीपेक्षा सहा अंशांनी जास्त होते.

हवामानाचा अंदाज ः
- पश्‍चिमी हिमालयात रविवार (ता. १२) ते मंगळवार (ता. १४) दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
- मध्य, दक्षिण, पश्‍चिम आणि पूर्व भारतात तुरळक भागांमध्ये १५ ते १७ मार्चदरम्यान पावसाचा इशारा
- देशाच्या मध्य पश्‍चिमी भागात द्रोणीय स्थिती आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पूर्व गुजरात येथे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
- दरम्यान या काळात दिवसाच्या कमाल तापमानात २ अंशांनी घट होऊ शकते