
पुणे जिल्ह्यात ५३ हजार कोटींची कामे
पुणे, ता. ११ ः पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रिंगरोड, एलिव्हेटेड मार्ग, पुणे-बंगळूर, पुणे-छत्रपती संभाजीनगर हे नवे प्रकल्प केले जाणार आहेत. सुमारे ६२५ किलोमीटरच्या कामांसाठी ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जीएसटी व रॉयल्टी माफ करावी, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
गडकरी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात नवे प्रकल्प भविष्यात केले जाणार आहेत. जेएनपीटी बंदरावर रेल्वे वाहतूक व रस्ते वाहतुकीची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत. दौंड, बारामतीपासून जेएनपीटीपर्यंत थेट दोन लेनची रेल्वे सुरू करावी. ही रेल्वे मुंबई, ठाण्यात जाणार नाही. त्यामुळे तेथील वाहतूक कमी होऊ शकते. यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही. पुणे-बंगळूर नवीन महामार्ग केला जाणार असून, त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. हा भाग पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातून जाणार असल्याने तेथील नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला जोडण्यासाठी विरारनंतर उड्डाणपूल केला जाणार आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पुढील काळात मोठे प्रकल्प केले जाणार आहे. त्याचा खर्च जास्त असल्याने राज्य सरकारने आम्हाला जीएसटी व रॉयल्टी माफी द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. तसेच, महामार्गांवर ठेकेदाराच्या रुग्णवाहिकांची सेवा चांगली नाही, अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका वेळेवर पोचाव्यात, यासाठी १०८ या सेवेसोबत करार केला जात आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्प, अंतर व खर्च
प्रकल्प - अंतर - खर्च (कोटी रूपयांत)
नाशिक फाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर - २९ - ८८४१
पुणे-शिरूर कॉरिडॉर - ५७ - १००००
तळेगाव-चाकण एलिव्हेटेड कॉरिडॉर - ५४ - ११०००
दिवेघाट- हडपसर मार्ग - २३ - ८२३