पुणे पर्यटन शहर कधी होणार?

पुणे पर्यटन शहर कधी होणार?

पुणे, ता. १२ ः आग्रा शहरात पोचल्यावर तुम्हाला तेथील वातावरण थेट ताजमहलपर्यंत पोचविते, अगदी छत्रपती संभाजीनगरला गेल्यावरही तुम्हाला अजिंठा-वेरूळची लेणी पाहण्याकडे पाऊले वळतात. पण ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पुण्यात तुम्ही आलात तर तुम्हाला नेमकी याउलट परिस्थिती दिसेल. तुम्हाला इथे अनेक पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, शैक्षणिक, संरक्षण, संशोधन संस्थांची नावे ऐकायला मिळतील, पण तिथपर्यंत पोचण्यासाठी आवश्‍यक पर्यटनपूरक वातावरण मात्र अनुभवास मिळत नाही. पुणे देखील ‘पर्यटन केंद्र’ आहे, याची महापालिका, राज्य सरकारलाच माहिती आहे का? असा प्रश्‍न पडतो.

पुण्याला पर्यटनास पूरक वातावरण, सोई-सुविधा असूनही शहराला ‘पर्यटन नगरी’ करण्याबाबत महापालिका, राज्य सरकारमध्ये कमालीची अनास्था असल्याचे वास्तव आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा ते आयटी हबपर्यंतची वाटचाल शहराला लाभली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची जगभर ख्याती असूनही ‘पयर्टन केंद्र’ म्हणून पुण्याकडे पाहण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन तयार होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

‘पुणे दर्शन’-हेरिटेज वॉक’च्या पुढे काय?
महापालिकेकडून पर्यटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘पुणे दर्शन’ला चांगला प्रतिसाद मिळतो. तर ऑक्‍टोबर २०२२ पासून सुरु झालेल्या हेरिटेज वॉक’च्या प्रत्येक कार्यक्रमाला १०-१५ जणांची हजेरी असते. याव्यतिरिक्त महापालिका पर्यटनवाढीसाठी काही प्रयोग राबविते का? अशा प्रश्‍नाला ‘आम्ही पर्यटन वाढीसाठी बाकी काही प्रयोग करत नाही,’ असे प्रशासनाचे उत्तर तयार असते. पुण्याच्या पर्यटनावर लक्ष केंद्रित केल्यास अन्य व्यवसायांनाही चालना मिळू शकते, याचा विचारही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनी नाही. शहरात विविध कामानिमित्त दररोज हजारो नागरिक येतात. त्यांना शहराच्या पर्यटनाची माहिती, सुविधा दिल्यास शहराच्या पर्यटन व्यवसायाला पोषक वातावरण मिळेल.

गणेशोत्सवाचे ‘ब्रॅंडिंग’ही नाही
जगात नावलौकीक असणाऱ्या पुण्याच्या गणेशोत्सवाचे साधे ब्रॅंडिंग करण्याचेही कष्ट घेतले जात नसल्याचे दुर्दैव आहे. सुरक्षित वातावरणात गणेशोत्सव पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास देश-परदेशातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्याला प्राधान्य देऊ शकतील. पण त्यासाठीही प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे.

काय आहे आपल्या पुण्यात?
लाल महाल, महात्मा फुले वाडा, आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, नाना वाडा, विश्रामबागवाडा, पर्वती मंदिर समूह, पाताळेश्‍वर प्राचीन मंदिर, त्रिशुंड्या गणपती मंदिर, भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, डेक्कन कॉलेज, महादजी शिंदे छत्री, एफटीआयआय, सदर्न कमांड, एनडीए, एएफएमसी, प्राणी संग्रहालय, धार्मिक स्थळे, शहरानजीकचे गडकिल्ले आदी.

पुण्याला मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्‍वभूमी आहे. त्यादृष्टीने देशातील अन्य शहरांप्रमाणे पुण्याला ‘पर्यटन नगरी’ म्हणून पुढे आणण्यासाठी ठोस प्रयत्न व्हायला पाहिजेत, तसे होत नाही. या पर्यटनाकडे गांभीर्याने पाहिल्यास शहराच्या अर्थकारणाला चांगली बळकटी मिळेल.
- पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक व सामाजिक कार्यकर्ते

शनिवारवाडा, नाना वाडा, विश्रामबागवाडा पर्यटकांसाठी खुले आहेत. ‘हेरिटेज वॉक’, ‘पुणे दर्शन’ बससेवा सुरु आहे. या व्यतिरिक्त पर्यटन वाढीसाठी अन्य प्रयोग राबविले जात नाहीत.
- सुनील मोहिते, कार्यकारी अभियंता, हेरिटेज सेल, पुणे महापालिका.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाकडे देश-परदेशातील पर्यटकांना महापालिकेस आकर्षित करता येत नाही. त्यामुळे बेरोजगारांना काम मिळेल, शहरातील हॉटेल्स, वाहन व्यवस्थेसह अन्य क्षेत्राच्या अर्थकारणात वाढ होईल.
- पियुष शहा, अध्यक्ष, साईनाथ मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com