
सोन्याच्या भावात तेजीची शक्यता
पुणे, ता. १२ : जगातील अनेक देशांत असलेले मंदीचे वातावरण, सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी, गुंतवणूक म्हणून होत असलेली खरेदी आणि लग्नसराईमुळे येत्या काळात सोन्याच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेले सोन्याचे भाव आता स्थिर झाले आहेत, तर चांदी आणखी स्वस्त झाली आहे.
आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्याकडील सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढवला होता. खरेदी वाढल्याने जानेवारी २०२३ अखेरपर्यंत सोन्या-चांदीचे भाव वाढत होते. मात्र, जागतिक मंदीचे संकट दूर होताना दिसत असल्याने नागरिकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात काही काळापुरते भाव कमी झाले होते. आता हे भाव स्थिर झाले असून, येत्या काळात ते वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सोन्या-चांदीचे भाव तेजीत राहण्याची कारणे
- अनेक देशांत असलेले मंदीचे वातावरण
- सिलिकॉन व्हॅली बँक झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी
- आगामी लग्नसराई
- जागतिक बँकांचे सोनेखरेदीवरील लक्ष
चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त
गेल्या १० दिवसांत सोने प्रति १० ग्रॅम सुमारे ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदीचे भाव कमी होणे अजून थांबलेले नाही. एक ते दहा मार्चदरम्यान चांदीचा प्रति किलो भाव तीन हजार रुपयांनी कमी झाला आहे.
भारतासह परदेशात सोन्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही दिवसांपूर्वी अनेकांनी नफा मिळवण्यासाठी सोन्याची खरेदी केली होती. आर्थिक मंदीची गणिते लक्षात घेऊन केलेली खरेदी आणि त्यानंतर परिस्थितीमध्ये झालेली सुधारणा यामुळे सोन्याचे भाव कमी झाले होते. सध्या सोन्याचे भाव स्थिर झाले आहेत. येत्या काळात भाव तेजीत राहतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे लग्नसराई किंवा इतर कोणत्या कारणांसाठी खरेदी करणार असाल, तर आता केलेली खरेदी फायद्याची ठरणार आहे.
- डॉ. सौरभ गाडगीळ,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
यंदाचे वर्ष ज्वेलरी क्षेत्रासाठी सकारात्मक असणार आहे. कारण, यंदा लग्नसराईत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. लग्नाचा मोसम केवळ भारतापुरता मर्यादित आहे. मात्र, परदेशात देखील चांगले चित्र आहे. जागतिक बँकांचे सोन्यावर लक्ष असणार आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी होईल. त्यातून तेजी राहणार आहे.
- वस्तुपाल रांका,
संचालक, रांका ज्वेलर्स
मार्चमधील सोने-चांदीचे भाव (रुपयांमध्ये)
तारीख सोने २४ कॅरेट सोने २२ कॅरेट चांदी (प्रतिकिलो)
१ ५५,८५० ५१,३८२ ६४,३५०
२ ५५,८३० ५१,३६४ ६३,६००
३ ५५,८७५ ५१,४०५ ६३,८५०
४ ५५,८७५ ५१,४०५ ६३,८५०
५ ५५,८७५ ५१,४०५ ६३,८५०
६ ५५,९३० ५१,४५६ ६४,१६०
७ ५५,९३० ५१,४५६ ६४,१६०
८ ५५,९३० ५१,४५६ ६४,१६०
९ ५४,९०० ५०,५०८ ६१,६००
१० ५५,४४० ५१,००५ ६१,३५०