मधुमेहाच्या आव्हानासाठी त्रिसूत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेहाच्या आव्हानासाठी त्रिसूत्री
मधुमेहाच्या आव्हानासाठी त्रिसूत्री

मधुमेहाच्या आव्हानासाठी त्रिसूत्री

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : मधुमेहाच्या वाढत्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सहयोगात्मक प्रयत्न, बहुआयामाची दृष्टिकोन आणि नवीन तंत्रज्ञान ही त्रिसूत्रीची गरज आहे, असे मत तज्ज्ञांना व्यक्त केला.
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटतर्फे सातव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत एकत्रित आलेल्या विशेषज्ज्ञ तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केले. परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी चिन्मय मिशनचे ग्लोबल हेड स्वामी स्वरूपानंद, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल चेलाराम, चेलाराम समुहाचे उपाध्यक्ष प्रकाश भुपटकर, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन एजी, शोभना चेलाराम, व्यवस्थापकीय संचालक डॉ. (ब्रिगेडियर) अनिल पंडित उपस्थित होते. या तीन दिवसीय परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन प्रगती आणि तंत्रज्ञानाची भूमिका यावर चर्चा करण्यात येणार आहे. दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. उन्नीकृष्णन म्हणाले, ‘‘भारतामध्ये मधुमेह असलेल्या लोकांची संख्या ७६ दशलक्ष आहे, तर ही संख्या जगभरात ५३७ दशलक्ष आहे. प्रत्येक वर्षी लाखो लोक मधुमेहामुळे मृत्यूमुखी पडतात. हे आकडे जरी महत्त्वाचे असले तरी त्यातून खरे चित्र प्रतिबिंबित होत नाही. या आकड्यांमुळे मधुमेह असणाऱ्या लोकांना होणारा त्रास व अशा प्रकारचा तपशील प्रतिबिंबित होत नाही. या परिषदेमध्ये छोट्या तपशीलापासून ते व्यापक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. या दुहेरी दृष्टिकोनाद्वारे मधुमेह आणि त्यावरील उपचारांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या परिषदेच्या केंद्रस्थानी मधुमेह असलेले रुग्ण आहेत.’’
‘क्रॉनिकल ऑफ डायबेटिस रिसर्च अॅण्ड प्रॅक्टिस’, ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३’ची स्मरणिका आणि ‘डायबेटिस हेल्थ मॅगेझिन’च्या नवीन अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आजची तरुण पिढी तंदुरुस्त राहण्यासाठी अधिक जागरूक आहे. या सजगतेबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाची जोड हे मधुमेहाच्या आव्हानांचा सामना करण्यास मदत करेल.
- डॉ. आशिष लेले, संचालक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

संशोधन करताना मनाचा मोकळेपणा, मूळ कारणांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आणि समग्र चित्र दिसण्यासाठी एखाद्या विषयावर भिन्न दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी हे सर्व उपाय शोधण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
- स्वामी स्वरूपानंदजी, ग्लोबल हे, चिन्मय मिशन