
आयुर्वेद संशोधनावर विचारमंथन
पुणे, ता. १२ ः इंटरनॅशनल आयुर्वेद असोसिएशन आणि संलग्न संस्थांतर्फे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतासह इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, एक्वादोर, कोलंबिया देशांतील १५० संशोधक सहभागी झाले होते.
वैद्य मॉरिशिओ लिऑन (दक्षिण अमेरिकेतील आयुर्वेद उपचार), वैद्या फरिदा इराणी (ऑस्ट्रेलिया येथील आयुर्वेद गंधचिकित्सा- बोवेन थेरपी), वैद्य प्रशांत सुरु (कर्करोग), डॉ. महेश मुळे (पुरुष वंध्यत्व), डॉ. रूपाली बावकर (पंचकर्म उपकरणांचे आधुनिकीकरण), तोया अफॉन्ट (अमेरिकेतील पंचकर्म) यांची व्याख्याने झाली. आयुर्वेद, योग, वनस्पती, पंचकर्म, औषध निर्माण या विषयांवरील संशोधनावर आधारित शोधनिबंध सादर केले गेले. डॉ. योगिनी कुलकर्णी, डॉ. कविता इंदापूरकर, डॉ. नीलाक्षी प्रधान, डॉ. योगिनी कुळकर्णी यांनी परीक्षण केले.
आयुर्वेदाच्या सर्व शाखांत जगभरातील विविध संस्थांमध्ये सुरु असलेले संशोधन एकाच ठिकाणी चर्चिले जावे यासाठी आयोजित करण्यात येणारे हे महत्त्वाचे संमेलन वैद्यकीय व्यावसायिक आणि संशोधकांनी स्वयंप्रेरणेने आयोजित केले असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. अतुल राक्षे यांनी दिली.
आयुर्वेद शास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर इतर विविध कार्यक्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानासाठी डॉ. संगीता बर्वे यांना ''कालिदास पुरस्कार'', भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. राजेंद्र दूरकर यांना भरतमुनी पुरस्कार, पंचकर्म उपकरणांतील संशोधनासाठी डॉ. रूपाली बावकर यांना आयुर्वेद इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील दसपुते, डॉ. कौस्तुभ घोडके, डॉ. पूनम पाटील, डॉ. आदिती बामनोलकर यांनी केले. शास्त्रीय समितीचे संचालन डॉ. महेश्वर तगारे, डॉ. सोनाली गटलेवार यांनी केले. सर्वोत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी विशेष पुरस्कार देण्यात आले. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांच्या ८९ वाढदिवसानिमित्त त्यांच्या इंग्रजी चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे डॉ. दिलीप पुराणिक, आयुर्वेद रसशाळेचे डॉ. विजय डोईफोडे, डॉ. धडफळे, डॉ. सातपुते यांच्यासह आयुर्वेद, योग क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.