
काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅली
पुणे, ता. १२ : जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्ताने मुलाणी आय केअर सेंटरतर्फे काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. लष्कर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम व ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अशोक मुलाणी यांच्या हस्ते झेंडा फडकावून रॅलीला सुरवात झाली.
सेंटरच्या प्रमुख आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. समिता मुलाणी-कटारा यांच्या नेतृत्वात ही सायकल रॅली महात्मा गांधी रस्ता, पूना लेडीज क्लब, पुलगेट आदी भागात काढण्यात आली. डॉक्टर्स, कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी, तसेच लष्कर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. मुलाणी-कटारा म्हणाल्या, ‘‘यंदा १२ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत जागतिक काचबिंदू सप्ताह राबविण्यात येत आहे. काचबिंदू तपासणी आणि जनजागृती करण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली. काचबिंदूमुळे अनेक लोकांना अंधत्व आले आहे. भारतात कोट्यवधी लोक काचबिंदूने ग्रासलेले आहेत. पण योग्य काळजी आणि उपचार घेतले तर काचबिंदूसारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो.’’