
जलसंपदा कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपामध्ये सहभाग
पुणे, ता. १२ ः राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. १४) बेमुदत संप पुकारला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य जलसंपदा (पाटबंधारे) व यांत्रिकी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी सहभाग घेणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश झणझणे आणि जिल्हाध्यक्ष दिनकर रायकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्य शासकीय कर्मचारी जे १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झाले, त्यांना नविन अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र त्यास कर्मचाऱ्यांचा विरोध असून ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्याची मागणी करत या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. यासाठी राज्य जलसंपदा (पाटबंधारे) व यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक झाली. त्यात १४ मार्च रोजी होणाऱ्या बेमुदत संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सरचिटणीस हनुमंत देशमुख, कार्याध्यक्ष दशरथ कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.