मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली असून कोकणात उष्णतेची लाट आली आहे. सोमवारपासून (ता. १३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद रविवारी सांताक्रूझ येथे ३९.४ अंश सेल्सिअस इतकी झाली. तीन ते चार दिवसांपासून सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. दरम्‍यान हे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी वाढला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोकण होरपळले आहे. सध्या तापमानातील वाढ कायम असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत कमी होत आहे.
दरम्यान, हवामानाची स्थिती पाहता सध्या पश्‍चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. त्याच्‍या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत (ता. १६) राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात आज ढगाळ वातावरण
पुणे व परिसरात रविवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. अंशतः ढगाळ वातावरणाचे चित्र शहरात पाहायला मिळाले. तर शहरात ३४. ७ कमाल तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे होता. कोरेगाव पार्क परिसरात ३७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सोमवारी (ता. १३) शहर व परिसरात सकाळी हलके धुके तर दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच, बुधवारपासून (ता. १५) विजांच्या कडकडाटासह हलक्या स्‍वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.


पुढील चार दिवस या जिल्ह्यांत पावसाची शक्यता ः
- सोमवार (ता. १३) ः नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना
- मंगळवार (ता. १४) ः नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर
- बुधवार (ता. १५) ः छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली, नागपूर, जळगाव
- गुरुवार (ता. १६) ः उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, जळगाव, परभणी, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया