नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी तरतूद
नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी तरतूद

नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी तरतूद

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची रविवारी (ता. १२) सांगता झाली. प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अमृत सरोवर’ तयार करण्यात येणार असून त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली असल्याचे जाहीर केले. तसेच भारतीय विज्ञान परिषदेत विद्यार्थी सहभाग, भाषाशास्त्र व अनुवाद अभ्यास केंद्र, मिलेट अभ्यास केंद्र, पुस्तक अनुवाद, विद्यापीठ संगीत भवन भौतिशास्त्र विभागाचा विस्तार आदींसाठी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
अधिसभेचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी काम पाहिले. अधिसभेचे सचिव म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी कार्यभार पाहिला. अधिसभेच्या सुरवातीला अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. काळे यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामगिरीचा अहवाल सादर केला. आभार डॉ. पवार यांनी मानले.

शिवाजी महाराजांच्या नावे शिष्यवृत्ती
ज्या विद्यार्थ्यांना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांच्या पालकांना दुर्धर आजाराने ग्रासाले आहे, अशा विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा प्रस्ताव डॉ. अपूर्व हिरे आणि अशोक सावंत यांनी अधिसभेसमोर ठेवला, त्याला प्रसेनजीत फडणवीस यांनी अनुमोदन दिले. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही अधिसभा अध्यक्षांनी जाहीर केले.

बीरसा मुंडा अध्यासनाचा प्रस्ताव
आदिवासी समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, समस्यांवर संशोधन होण्याच्या उद्देशाने विद्यापीठात बीरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याचा प्रस्ताव अधिसभेत रविवारी मंजूर करण्यात आला. अध्यासनामुळे आदिवासी समाजाच्या संशोधनाबरोबरच आदिवासी हस्तकला चित्रकला, नृत्य यातून उद्योजकता विकास करणे यासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करता येतील. तसेच आदिवासी समाजासाठी असणारी धोरणे कार्यक्रम घटनात्मक तरतुदी विकासाचे प्रश्न यासंबंधी जागृती निर्माण करणे शक्य होईल, असे अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे म्हणाले.